लातुरात जुगार अड्ड्यावर छापा; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: June 19, 2023 07:42 PM2023-06-19T19:42:48+5:302023-06-19T19:43:00+5:30
एमआयडीसी ठाण्यात १४ जुगाऱ्यांवर गुन्हा...
लातूर : शहरालगत असलेल्या खाडगाव शिवारात एका झाडाखाली सुरू असलेल्या जुगारावर पाेलिस पथकाने रविवारी रात्री उशिरा अचानकपणे छापा मारला. यावेळी राेख रक्कमेसह एकूण १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत साेमवारी एकूण १४ जुगाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरालगत असलेल्या असलेल्या खाडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार सुरू असून, बीड, धर्मापुरी, परळी वैजनाथ, धाराशिव, रेणापूर, लातूर आदीं परिसरातून जुगार खेळण्यासाठी जुगारी आल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने खाडगाव शिवारात रविवारी अचानकपणे छापा मारला. यावेळी माेबाइल, राेख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा जवळपास १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात एकूण १४ जुगाऱ्यांविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी दिली.
कारसह ७ दुचाकी,११ माेबाइल जप्त...
लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये जुगाऱ्यांकडून एक कार, ७ दुचाकी, ११ माेबाइल आणि राेख ५९ हजार ७०० रुपये असा जवळपास १५ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई रात्री उशिरा पाेलिस पथकाने केली.
१० जुगारी जाळ्यात; चार जणांचे पलायन...
खाडगाव शिवारात टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण १४ जुगाऱ्यांपैकी १० जुगाऱ्यांना पकडण्यात पाेलिस पथकाला यश आले असून, चार जुगारी अंधाराचा फायदा घेत पळाले आहेत. हे जुगारी लातूरसह शेजारच्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे पाेलिस उपनिरीक्षक संदीप कराड म्हणाले.