लातुरात जुगार अड्ड्यावर छापा; २१ जुगारी पाेलिसांच्या जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Published: May 25, 2023 03:18 PM2023-05-25T15:18:48+5:302023-05-25T15:32:14+5:30
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला
लातूर : शहरातील रिंग राेड परिसरात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर पाेलिस पथकाने छापा मारला असून, २१ जुगारी जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून तब्बल १० लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील १५ जणांना पाेलिसांनी पकडले असून, सहा जण पळून गेले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील रिंग राेड परिसरात एका शेतात तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पाेलिस पथकाला तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला. दरम्यान, पाेलिस पथकाने शेतात सुरू असलेल्या जुगारावर छापा मारला. यावेळी २१ जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा एकूण १० लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चौक पाेलिस ठाण्यात २१ जुगाऱ्यांच्या विराेधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सचिन द्रोणाचार्य, शैलेश जाधव, मोहन सुरवसे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, नानासाहेब भोंग, सचिन धारेकर, तुराब पठाण, जमीर शेख यांच्यासह आरसीपी प्लाटूनमधील कोळी, शिरसाठ, जाधव, रेड्डी, काळे, किनाळे, टेकाळे, तोगरे यांच्या पथकाने केली.