लातूर एमआयडीसीत थाटला गुटखा कारखाना; २७९ गोण्यातील अडीज कोटींचा गुटखा जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: May 29, 2024 07:18 PM2024-05-29T19:18:57+5:302024-05-29T19:19:42+5:30
लातुरात पोलिसांची कारवाई; सात जणांवर गुन्हा दाखल, तीन कोटींचा मुद्देमाल जप्त
लातूर : शहरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात थाटण्यात आलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी बुधवारी सकाळी धाड टाकली. या धाडीत २७९ गोण्यातील २ कोटी ३० लाख ६२ हजार रुपयांचा गुटख्यासह तब्बल ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकूण सात जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरतील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात धनंजय कोंबडे यांच्या कोंबडे ऍग्रो वेअर हाऊस, सी / २७ वेअर हाऊस येथे गुटखा तयार करण्यात येत असून, याच परिसरात गुटख्याचा करखनाच सुरु करण्यात आल्याची माहिती खबऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना दिली. याबाबतच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर चाकूर येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पोउपनि. होनाजी चिरमडे, पोउपनि. राजेश घाडगे, पोहेकॉ. विष्णू गुंडरे, पोना. अनंतवाड, पोकॉ. कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांना सोबत घेऊन बुधवारी धाड टाकली. यावेळी तब्बल ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अंकुश रामकिशन कदम (३२,र. रायवाडी ता. चाकूर), हसनाकुमार तिलाई उराम (२१ रा. बिहार), गोकुळ धनाराम मेघवाल (रा. राजस्थान), धनंजय गहिनीनाथ कोंबडे, पारस बालचंद पोकर्णा, राम केंद्रे आणि विजय केंद्रे (चौघेही रा. लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्योगाच्या नावाखाली गुटख्याची निर्मिती, विक्री..?
लातुरातील एमआयडीसी परिसरात उद्योगाच्या नावाखाली छुप्या पध्दतीने गुटखा तयार करुन, तो ट्रक आणि इतर वाहनातून विक्री केला जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या धाडीत समोर आला आहे. पोलिसांनी कोट्यवधींची उलाढाल करणारा गोरखधंदाच उधळून लावला आहे.
लातूर शहर पोलिसांना नाही कुठलीही खबर..
लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनातून कोट्यवधींचा गुटखा पुरवला जात आसल्याचे आता समोर आले आहे. हा अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांच्या नजरेला कसा काय पडला नाही? याबाबत नागरिकांत कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खबऱ्याने पोलिसांना दिली टीप;गुटख्याचा कारखान्याचे फुटले बिंग..
आठवडाभरापूर्वीच खबऱ्याला एमआयडीसीतील गुटख्याच्या कारखान्याची माहिती मिळाली. ही माहिती, टीप पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली, त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. यातून कोटयवधीची उलाढाल असलेल्या गुटख्याच्या कारखान्याचे बिंग फुटले आहे.