रेणापूर तालुक्यात हातभट्टी अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखांचे रसायन नष्ट
By संदीप शिंदे | Published: May 4, 2023 06:19 PM2023-05-04T18:19:12+5:302023-05-04T18:26:53+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
लातूर : रेणापूर तालुक्यातील वसंत तांडा, महापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १ लाख ८४ हजार रुपयांचे रसायन नष्ट केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रेणापुर तालुक्यातील वसंतनगर तांडा, महापूर येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी शनिवारी सकाळी छापामारी केली.
यामध्ये ३ हजार ४० लिटर रसायन, साहित्य, हातभट्टीची दारू असा एकूण १ लाख ८४ हजार रुपयांचे हातभट्टी निर्मितीचे साहित्य नष्ट केले. याप्रकरणी सुखदेव खंडू राठोड, गणेश राम राठोड (रा. वसंत तांडा, महापूर) व एका महिलेविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात कलम ६५(ड) (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पथकामध्ये सहाय्यक फौजदार अंगद कोतवाड, पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हसबे, तुराब पठाण, जमीर शेख, राजू मस्के, नकुल पाटील यांचा समावेश होता.