लातुरात अवैध धंदे, जुगारावर छापा; ३८ जणाविरोधात गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: August 9, 2023 06:37 PM2023-08-09T18:37:56+5:302023-08-09T18:38:12+5:30
दोन दिवसांत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसाय, जुगारावर एकाच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापा मारला असून, याबाबत एकूण ३८ जणाविरोधत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका आणि अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी अवैध व्यवसायावर छापेमारी केली. याप्रकरणी जुगार आणि दारूबंदी कायद्यान्वये पाच जणाविरोधात गुन्हे दाखल केला. यावेळी ७ लाख ६ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत छापासत्र सुरुच होते. यात लातूर जिल्ह्यातील देवणी आणि गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा मारून ३८ जुगारऱ्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. संध्याकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने देवणी तालुक्यात एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तर दुसऱ्या पथकाने लातुरातील गांधी चौक ठाण्याच्या हद्दीत साठफूट रोडवर एका बारच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगारावर छापा मारला. यावेळी दोन्ही ठिकाणी ३८ जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलीस पथकाने जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहने असा ८ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. व्यंकटेश आलेवार, खुर्रम काझी, रवी गोंदकर, दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख, नकुल पाटील यांच्या पथकाने केली आहे.