लातूर जिल्ह्यात भेसळीच्या संशयाने धाडी; दूध, पेढ्याचे घेतले नमुने
By हरी मोकाशे | Published: September 15, 2023 08:06 PM2023-09-15T20:06:23+5:302023-09-15T20:06:57+5:30
लातूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
लातूर : सणासुदीच्या काळात नागरिकांना भेसळमुक्त, शुद्ध, ताजे व उत्तम प्रतिचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत म्हणून महिनाभरात जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून दूध, खवा व पेढ्याचे ३२ नमुने घेण्यात आले आहेत. त्यात भेसळ, विनापरवाना अन्न पदार्थ विक्री केल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या अध्यक्षतेखाली दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना भेसळमुक्त, शुद्ध, ताजे व उत्तम प्रतीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत म्हणून जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांसमवेत १८ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २१ दूध डेअरी, खवा, पेढा भट्टी व दुकाने, दूध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात संशयित आढळलेले दूध, खवा, पेढ्यांचे ३२ नमुने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
पदार्थ बनविताना काळजी घ्या...
गणेशोत्सव, दसरा आदी सणासुदीच्या काळात विविध मंडळातर्फे भंडारा, प्रसाद, अन्नदान असे कार्यक्रम घेण्यात येतात. अन्नपदार्थ, प्रसाद तयार करताना मंडळ, अन्न व्यावसायिक, उत्पादकांनी अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन नाममात्र शुल्क भरुन प्रमाणपत्र घ्यावे. प्रसाद तयार करण्याची जागा स्वच्छ असावी, साहित्य परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावे. प्रसादासाठीची भांडी स्वच्छ असावी. आवश्यक तेवढाच प्रसाद करावा.
बेस्ट बिफोरचा बोर्ड लावावा...
स्वीट मार्ट धारकांनी स्वच्छ, ताजी मिठाई, मोदक तयार करून विक्री करावी. कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकाकडून खरेदी करावा. त्याची पक्की बिले घेऊन जतन करून ठेवावी. मिठाईच्या ट्रेसमोर बेस्ट बिफोरचा बोर्ड लावावा. दूध व दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये. अन्यथा संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
- शि.बा. कोडगिरे, सहाय्यक आयुक्त, अन्न.
भेसळीसंदर्भात तक्रार करा...
नागरिकांना दूध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार अथवा जिल्ह्यात कोठेही भेसळ होत असल्याचे दिसून आल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयास अथवा १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त शि. बा. कोडगिरे यांनी केले आहे.