अवैध दारू विक्रीप्रकरणी धाडसत्र; ५७८ अडकले पथकाच्या जाळ्यात !
By राजकुमार जोंधळे | Published: November 21, 2023 07:22 PM2023-11-21T19:22:25+5:302023-11-21T19:22:33+5:30
‘उत्पादन शुल्क’ची कारवाई, सव्वा काेटीचा मुद्देमाल जप्त...
लातूर : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री हाेत असल्याचे धाडसत्रातून समाेर आले आहे. एप्रिल ते ऑक्टाेबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर आणि उदगीर येथील पथकांनी स्वतंत्रपणे केलेल्या कारवायांत एकूण ५७८ मद्यपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. याप्रकरणी संबंधितांविरोधात एकूण ५२३ गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ६२ वाहनांसह एकूण १ काेटी १३ लाख ६० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील वाडी-तांड्यांसह ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर चाेरट्या मार्गाने अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याचे धाडसत्रात समाेर आले आहे. काहीजण छाेट्या-छाेट्या गावात अवैध देशी, हातभट्टी दारूची विक्री करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी अवैध देशी दारू, हातभट्टी आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणारे हजाराे लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे. एप्रिल ते ऑक्टाेबरअखेर पथकाने केलेल्या कारवायांत तब्बल ५७८ आराेपी पथकाच्या जाळ्यात अडकले. याबाबत त्यांच्याविराेधात ५२३ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाडी-तांड्यांवर धाडी; वाहनांतून दारू वाहतूक...
लातूर, उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवायांत माेठ्या प्रमाणावर चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक हाेत असल्याचे आढळून आले आहे. यावेळी वाहनांसह माेठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा पथकाने जप्त केला आहे. गत सात महिन्यांत ६२ वाहने जप्त केली आहेत.
अवैध दारूप्रकरणी पथक करणार कारवाई...
लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर हाेणारी अवैध दारूविक्री आणि वाहतूक राेखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाकडून प्रयत्न केले जातात. अवैध दारूबाबत स्थानिक नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. ही कारवाई सुरूच राहणार आहे.
- केशव राऊत, अधीक्षक, लातूर
लातूर जिल्ह्यातील सात महिन्यांत धाडी...
दाखल गुन्हे - ५२३
वारस - ४८८
बेवारस - ०३४
आरोपी - ५७८
जप्त वाहने - ०६२
एकूण मुद्देमाल - १,१३,६०,४२०