एकाचवेळी तीन जुगार अड्ड्यांवर छापा; आनंदवाडी, मरशिवणी शिवारात विशेष पथकाची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: October 8, 2022 04:36 PM2022-10-08T16:36:10+5:302022-10-08T16:36:39+5:30
पोलिसांनी बारा जुगाऱ्यांना पकडले तर तिघांनी केले पलायन
अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील आनंदवाडी, मरशिवणी शिवारातील आखाड्यावर सुरु असलेल्या तिर्रट जुगारावर विशेष पाेलीस पथकाने एकाचवेळी छापा मारला. यावेळी बारा जणांना पकडले असून, तिघे पळून गेले आहेत. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा एकूण ५ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर-चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवाडी आणि मरशिवणी शिवारातील आखाड्यावर असलेल्या जुगारावर ८ ऑक्टाेबर राेजी छापा मारला. यावेळी तिर्रट नावाचा जुगार खेळताना १५ जण आढळून आले. यातील बारा जणांना पाेलीस पथकाने ताब्यात घेतले असून, तिघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात गुरनं. ४७९/२०२२ आणि गुरनं. ४८० / २०२२ कलम ४, ५ मुंबई जुगार कायद्यान्वये स्वतंत्र दाेन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून पाेलिसांनी जुगाराचे साहितय, वाहने, माेबाईल फाेन, राेख रक्कम असा एकूण ५ लाख १९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांच्या पथकातील पाेलीस कर्मचारी हाके, कलमे, पुट्टेवाड, अंधूरकर, हंगरगे यांनी केली आहे.