हातभट्टी दारु अड्डयांवर विशेष पथकांच्या धाडी; जोरदार कारवाईत १५ जणांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: May 3, 2024 03:33 PM2024-05-03T15:33:42+5:302024-05-03T15:34:38+5:30
लातूर येथे गुन्हा अन्वेशन विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
लातूर : जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत हातभट्टी दारु निर्मिती करणाऱ्या १५ ठिकाणच्या अड्डयांवर गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने सलग दाेन दिवस धाडी टाकल्या. यावेळी माेठ्या प्रमाणावर दारुसाठा जप्त केला असून, १५ जणांना अटक केली आहे. याबाबत १५ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धाडसत्रात पथकाने जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी सांगितले, गुन्हा अन्वेशन, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री, निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर विशेष पथकांनी धाडी टाकल्या. दाेन दिवसामध्ये १५ ठिकाणी सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी १५ जणांना अटक करण्यात आली असून, हातभट्टी दारु ३२७ लिटर, निर्मितीसाठी लागणारे रसायन ३४५ लिटर, देशी दारु ७२ लिटर, विदेशी दारु १७.३२ लिटर दारुसाठा जप्त केला आहे. पथकाने १ लाख १३ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत एकूण १५ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.