जिल्ह्यात अवैध व्यवसायावर छापा; कारसह देशी-विदेशी दारूसाठा जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: January 13, 2023 07:45 PM2023-01-13T19:45:39+5:302023-01-13T19:46:17+5:30
अवैध व्यवसायाविराेधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई हाती घेतली आहे. छापासत्रात कारसह देशी-विदेशी दारू एका घरफाेडीचा उलगडा झाला.
लातूर : अवैध व्यवसायाविराेधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई हाती घेतली आहे. छापासत्रात कारसह देशी-विदेशी दारू एका घरफाेडीचा उलगडा झाला. याप्रकरणी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याविराेधात कारवाईचे आदेश दिले. स्थागुशाचे पोनि. गजानन भातलवंडे यांच्या पथकाने दाेन ठिकाणी छापा मारला. दरम्यान, १२ जानेवारी रोजी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील म्हाडा कॉलनीत कारमधून विदेशी दारूची अवैध विक्री, व्यवसायासाठी जाताना पथकाला आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाताना पथकाने दोघांपैकी एकाला पकडले. हरजीतसिंग ऊर्फ पापे सरपालसिंग टाक (वय ३२, रा. तळहिप्परगा, हगलूर ता. उत्तर सोलापूर) असे त्याचे नाव आहे. तर दुसरा करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी (रा. संजयनगर, लातूर) पळून गेला. कारची झडती घेतली असता विदेशी दारू आढळून आली. पथकाने कारसह दारू असा १ लाख ८७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सपोनि. सचिन द्रोणाचार्य, पोउपनि. शैलेश जाधव, सहायक फौजदार संजय भोसले, राम गवारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रदीप चोपणे, नवनाथ हासबे, प्रमोद तरडे, तुराब पठाण यांच्या पथकाने केली.
औरादच्या एकाला घेतले ताब्यात...
दुसऱ्या घटनेत पाेलिस पथकाने विष्णू शंकर अंतरेड्डी (वय ३६, रा. औराद, ता. निलंगा) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून अवैध, चाेरट्या मार्गाने विक्रीसाठी बाळगलेली देशी दारू असा १७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.