अवैध दारू अड्ड्यांवर छापासत्र; ३५ लाखांची देशी-विदेशी जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: August 4, 2023 07:33 PM2023-08-04T19:33:33+5:302023-08-04T19:35:24+5:30
उत्पादन शुल्कची कारवाई : १४१ गुन्ह्यात १२८ जणांना अटक
राजकुमार जाेंधळे, लातूर : जिल्हाभरातील विविध तांड्यावर असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारला. याबाबत एकूण १४१ गुन्हे दाखल केले असून, १२८ जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १२ हजार २२० लिटर हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन, ३ हजार २२ लिटर हातभट्टी दारू, ९७९ लिटर देशी दारू, १५१ लिटर विदेशी दारू, २२ चारचाकी, दुचाकी वाहने असा एकूण ३४ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर हातभट्टी निर्मिती आणि विक्री हाेत असल्याने लातूर आणि उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १ ते ३ ऑगस्टदरम्यान वसंतनगर तांडा, नेहरुनगर तांडा, डाेंगरशेळकी तांडा, लातूर आणि उदगीर विभागातील ढाब्यावर छापा मारला. यावेळी ढाब्यावर अवैध दारू घेणाऱ्या आणि देणाऱ्या ढाबा मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात ८ जणांसह २ ढाबा मालकांना अटक केली आहे. लातूर जिल्ह्यात सलग तीन दिवस विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यांवर छापा मारून, तब्बल ३४ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याबाबत एकूण १४१ स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, १२८ जणांना केली आहे.
ही कारवाई अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.एस. काेतवाल, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्निल काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, अनंत कारभारी, नीलेश गुणाले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एस.जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली आहे.