लातूरमधून दोन महिन्यात रेल्वेची बोगी पडणार बाहेर : पालकमंत्री निलंगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:04 PM2018-10-12T13:04:35+5:302018-10-12T13:06:09+5:30
२५ डिसेंबर २०१८ पर्यंत रेल्वेची बोगी या कारखान्यातून तयार होऊन बाहेर पडेल, असा विश्वास पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे व्यक्त केला.
- हणमंत गायकवाड
लातूर : मराठवाड्याच्या दृष्टिने रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. अत्यंत वेगाने सुरु झालेला हा प्रकल्प असून, २५ डिसेंबर २०१८ पर्यंत रेल्वेची बोगी या कारखान्यातून तयार होऊन बाहेर पडेल, असा विश्वास पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे व्यक्त केला.
हरंगुळ परिसरात रेल्वे कोच फॅक्टरीच्या प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन आज झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर खा. डॉ. सुनील गाायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, आ. त्रिंबक भिसे, आ. विक्रम काळे, रेल्वेचे प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा रेड्डी, रेल्वे विकास निगमचे समूह व्यवस्थापक एस. एस. मिश्रा, महापौर सुरेश पवार, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, गणेश हाके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, रेल्वे बोगीचा प्रकल्प अत्यंत गतीने सुरु झाला आहे. मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांनी सहकार्य केले. त्यामुळे हा प्रकल्प लातूरला मिळाला. येत्या ३ नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्री पियूष गोयल झालेल्या कामाचा आढावा घेणार आहेत. २५ डिसेंबर २०१८ पर्यंत या कारखान्यात रेल्वेची बोगी तयार होईल, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक एस. एस. मिश्रा यांनी केले. यावेळी रेल्वेचे प्रकल्प व्यवस्थापक रेड्डी म्हणाले, कमी वेळेत हा प्रकल्प सुरु झालेला आहे. येत्या दोन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण केली. सध्या जिल्हा प्रशानसनाकडून हवे ते सहकार्य रेल्वे प्रकल्प उभारणीला केले जाईल.