उदगीरच्या समतानगरातील रेल्वे फाटक पाच दिवस बंद; ५ किमीचा वळसा पडणार
By हरी मोकाशे | Published: September 26, 2023 05:50 PM2023-09-26T17:50:53+5:302023-09-26T17:51:24+5:30
रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
उदगीर : रेल्वेच्या वाहतुकीमुळे शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटक सातत्याने बंद होते. त्यामुळे हैराण होत असलेल्या नागरिकांना आता पाच दिवस घरी जाण्यासाठी पाच किमीचा वळसा घालावा लागणार आहे. समतानगर भागातील मध्य रेल्वेचे फाटक, रूळ पटरी बदलण्यासाठी व रस्ता तयार करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटकामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. या मार्गाचा नेत्रगाव, बनशेळकी, देवणी, येणकी, मानकी, संतोषी माता नगर, हनुमान नगर, गोपाळ नगर, क्रांतीनगरकडे जाण्यासाठी वापर केला करण्यात येतो. दरम्यान, मागील कांही दिवसांपासून रेल्वेची वाहतूक वाढल्यामुळे या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसामध्ये वारंवार बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्याच्या परिसरात भाजी विक्रेते थांबतात. त्याचबरोबर रस्ता अरुंद असून ऑटोचालकही अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांसह नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावर उड्डाणपूल तयार करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, ती अद्यापही प्रलंबित आहे.
दरम्यान, मध्य रेल्वे विभागाने रेल्वेचे रूळ बदलणे व रस्ता तयार करण्याच्या कामासाठी मंगळवार ते शनिवार या कालावधीत म्हणजे सलग पाच दिवस हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. परिणामी, रेल्वे पटरी पलिकडे असलेल्या समतानगर भागात जाण्यासाठी आता लातूर रोडवर असलेल्या उड्डाणपुलाला वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे पाच किमीचा फेरा पडणार आहे. रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.