लातूर मनपाला रेल्वेने दिले ९ कोटींचे बिल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 07:57 PM2019-09-04T19:57:37+5:302019-09-04T20:00:45+5:30
लातूर शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट समोर असताना २०१६ मध्ये केलेल्या पाणी पुरवठ्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल रेल्वेने पुन्हा २८ ऑगस्ट रोजी पाठविले आहे.
लातूर : लातूर शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट समोर असताना २०१६ मध्ये केलेल्या पाणी पुरवठ्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल रेल्वेने पुन्हा २८ ऑगस्ट रोजी पाठविले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रेल्वेचा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान हे बिल राज्य शासनाने भरावे अथवा माफ करण्यात यावे, असा पत्रव्यवहार लातूर मनपा पुन्हा करणार आहे.
२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता. ९ एप्रिल ते ९ ऑगस्ट २०१६ पर्यंत रेल्वेच्या १११ फेऱ्या झाल्या होत्या. प्रारंभीचे ५ दिवस ५ लाख लिटर पाणी आणले होते. त्यानंतर दररोज २५ लाख लिटर पाणी रेल्वेद्वारे मिरजहून आले होते. ९ एप्रिल ते ९ ऑगस्ट या पाच महिन्यात २५ कोटी ९५ लाख लिटरचा पाणी पुरवठा रेल्वेद्वारे लातूर शहराला झाला होता. त्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल भरावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पत्रावर कारवाई करावी म्हणून मनपा प्रशासनाला हे पत्र पाठविले आहे. सध्या लातूर शहरात तीव्र पाणी टंचाईचे संकट आहे. २०१६ पेक्षा भीषण परिस्थिती समोर दिसत आहे. मांजरा प्रकल्पात ५.२५ दलघमी पाणीसाठा आहे. सप्टेंबर महिन्यात दोनच वेळा नळाद्वारे पाणी सुटणार आहे. परतीचा पाऊस नाही झाला तर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन मनपा प्रशासन करीत आहे. त्यातच सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने २०१६ चे बिल पाठविल्याने अडचणीत भर पडली आहे.
यापूर्वीही केला पत्रव्यवहार; यंदाही भीषण टंचाई...
रेल्वेने पहिल्यांदाच बिल पाठविले आहे असे नाही. यापूर्वीही पत्रव्यवहार केलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. या संदर्भात मनपा आयुक्त एम.डी. सिंह म्हणाले, सदर बिल शासनाने भरावे किंवा माफ करण्यात यावे, असा पत्रव्यवहार महापालिकेकडून झालेला आहे. दरम्यान, परतीचा पाऊस झाला नाही तर पुढच्याच महिन्यात ऑक्टोबरपासून २०१६ पेक्षा भीषण स्थिती आहे. लातूरवासीयांना नळाद्वारे सप्टेंबर महिन्यात दोनवेळाच पाणी मिळेल. त्यानंतर पाऊस न झाल्यास टँकर हाच पर्याय आहे.