पावसाने भर उन्हाळ्यात बॅरेज भरले; अतिरिक्त पाणी कर्नाटकात वाहिले
By हरी मोकाशे | Published: May 5, 2023 06:05 PM2023-05-05T18:05:17+5:302023-05-05T18:05:40+5:30
सव्वा महिन्यात २६० मिमी पाऊस; उच्चस्तरीय, कोल्हापुरी बंधारे भरले
औराद शहाजानी : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळीचा कहर आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या चार दिवसांत एकूण २६० मिमी पाऊस झाला असून आजपर्यंत सर्वाधिक असा नोंदला गेला आहे. मुसळधारेमुळे नाले, ओढे तर वाहिलेच. शिवाय, तेरणा नदी वाहती होऊन नदीवरील कोरडे पडलेले चार उच्चस्तरीय बंधारे व दोन कोल्हापुरी बंधारे पुन्हा भर उन्हाळ्यात भरले आहेत. या बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी कर्नाटकात साेडून देण्यात आले आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीच्या तेरणा नदी पट्ट्यात यंदा कधी उन्हाळा तर कधी पावसाळ्याचा प्रत्यय येत आहे. तापमानाचा पारा ४३ अं.से.पर्यंत पोहोचला असताना अवकाळी पावसाचा माराही होत आहे. या उन्हं पावसाच्या खेळात एप्रिलमध्ये कमाल तापमान ४३.५ अं.से. असे नोंदले गेले. तसेच पावसानेही उन्हाळ्यात नवा विक्रम केला. एप्रिलमध्ये १७७ मिमी एवढा पाऊस झाला. मे महिन्याच्या ५ तारखेपर्यंत ९० मिमी पाऊस झाला. दोनदा ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गुरुवारी तासभरात पुन्हा ५० मिमी पाऊस झाला. त्यामुळे तेरणा नदी पट्ट्यातील ओढे, नाले आणि काही ठिकाणी नदीचे पात्रही वाहते झाले.
उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे उघडली...
नदीवरील औराद, तगरखेडा, गुंजरगा हे उच्चस्तरीय बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सोनखेड उच्चस्तरीय बंधारा क्षमतेप्रमाणे भरला आहे. याशिवाय चांदोरी येथील ओढ्यावरील कोल्हापुरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून मांजरा नदीवरील वांजरखेडा बंधाऱ्यातील कमी झालेला जलसाठा पुन्हा वाढला आहे. शुक्रवारी पहाटे या सर्व उच्चस्तरीय बंधाऱ्याची दारे दीड मीटरने उघडून अतिरिक्त पाणी कर्नाटकात साेडून देण्यात आल्याची माहिती जलसिंचनचे अभियंता काेल्हे यांनी दिली.
भाजीपाला, फळबागांना मोठा फटका...
एकंदरित, या भागातील कोरडे पडलेले नाले, नद्या पावसाळ्यासारख्या वाहू लागल्या आहेत. अवकाळी पावसात वीज पडून गेल्या आठवड्यात दाेघांचा बळी गेला. तसेच २४ पेक्षा अधिक जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील फळबागा, भाजीपाला, ज्वारीचे अतोनात नुकसान झाले. हाता- तोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली. द्राक्ष, शेवग्याच्या बागांना फटका बसला आहे. टोमॅटोचीही नासाडी झाली आहे.
जमिनीची धूप हाेईना...
यंदाच्या उन्हाळ्यात सतत अवकाळी पाऊस होत असल्याने जमिनीच्या मशागत अद्याप झाली नाही. नांगरणीसह शेतीतील मेहनतीची कामे झाली नाहीत. जमीन तापली नाही. त्यामुळे जमिनीची धूप हाेणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील वर्षी उत्पादन निघत नाही, असे शेतकरी शिवाजी अंचुळे यांनी सांगितले.