मृग नक्षत्रात वरुणराजाची कृपा झाली; लातूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे १४ टँकर बंद
By हरी मोकाशे | Published: June 22, 2024 06:42 PM2024-06-22T18:42:43+5:302024-06-22T18:44:04+5:30
आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ, लातूर जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्याही घटली
लातूर : उन्हाचे तीव्र चटके सहन करीत पाण्यासाठी होरपळून निघालेल्या नागरिकांचे पावसाळ्याकडे डोळे लागले होते. मृगाने प्रारंभीपासून दमदार बरसात केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्या घटली आहे, तर पाणीपुरवठ्याचे १४ टँकर बंद झाले आहेत. शुक्रवारपासून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असून बळीराजाबरोबर प्रशासनाच्याही आशा उंचावल्या आहेत.
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७०६ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र, त्या तुलनेत गेल्यावर्षी केवळ ७३ टक्के पाऊस झाला होता. परिणामी, जिल्ह्यातील नद्या, नाले वाहिले नाहीत. मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर खरीपातील उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली. जिल्ह्यात
हिवाळ्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली. तद्नंतर फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसू लागले आणि मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सियसपर्यंत पोहोचला. त्यामुळे उन्हाबरोबर पाण्यासाठी नागरिकांची होरपळ वाढली.
टंचाई निवारणासाठी होती ५८४ अधिग्रहणे...
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ४२९ गावांना ५८४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. त्याचबरोबर ३१ गावे आणि १६ वाड्यांना ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मृगाच्या प्रारंभापासून पाऊस झाल्याने काही प्रमाणात जलसाठा झाला. गावच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी आल्याने प्रशासनाने ९१ अधिग्रहणे बंद केली. त्याचबरोबर १४ टँकर बंद करण्यात आली आहेत.
सध्या जिल्ह्यात ४९३ अधिग्रहणे...
तालुका - अधिग्रहणे
लातूर - ७६
औसा - ००
निलंगा - १०८
रेणापूर - ८५
अहमदपूर - ९८
चाकूर - ३८
शिरुर अनं.- २०
उदगीर - २९
देवणी - ०९
जळकोट - ३०
एकूण - ४९३
औसा तालुक्यातील सर्व टँकर बंद...
जिल्ह्यात सर्वाधिक अधिग्रहणे व टँकर औसा तालुक्यात सुरु होते. दरम्यान, औसा तालुक्यात मृगाचा दमदार पाऊस झाल्याने सर्व अर्थात दहाही टँकर बंद करण्यात आले आहेत. तसेच लातूर आणि रेणापूर तालुक्यातील एक तर जळकोटातील दोन टँकर बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १९१ मिमी पाऊस...
तालुका - पाऊस (मिमी)
लातूर - २१२.२
औसा - २३८.१
अहमदपूर - १४८.७
निलंगा - २०४.१
उदगीर - १४९.०
चाकूर - २११.१
रेणापूर - २२९.९
देवणी - १५१.७
शिरुर अनं. - १६४.१
जळकोट - ८४.७
एकूण - १९१.२
३६ गावांना ३० टँकर सुरु...
पावसामुळे पाणीटंचाई कमी झाली असली तरी सध्या ३६ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात लातूर तालुक्यात १३, रेणापूर - १, अहमदपूर- ७, उदगीर- ३, जळकोट तालुक्यात ६ टँकर सुरु आहेत. तसेच ३६९ गावांना ४९३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाच दिवसांपासून पावसाची उघडीप...
मृगाच्या प्रारंभापासून पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणीसही वेग आला आहे. मात्र, गेल्या पाच- सहा दिवासांपासून पावसाने उघडीप दिली आहे. शुक्रवारपासून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असल्याने आभाळाकडे नजरा लागत आहेत.
दमदार पावसामुळे टँकर, अधिग्रहण घटले...
पावसाळ्याच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस झाल्याने जलसाठा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ टँकर आणि ९१ अधिग्रहणे बंद करण्यात आली आहेत.
- बाळसाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद.