उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
By राजकुमार जोंधळे | Published: September 21, 2024 10:16 PM2024-09-21T22:16:48+5:302024-09-21T22:18:18+5:30
उजनी परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते
राजकुमार जाेंधळे, लातूर: औसा तालुक्यातील उजनी परिसरात शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने झाेडपले. उजनी गावानजी असलेल्या ओढ्याला पूर आल्याने उजनी-एकंबी तांडा, उजनी-मासुर्डी मार्ग पाण्याखाली गेला. दरम्यान, या दाेन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
उजनी परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. दरम्यान, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. काही वेळातच तेरणा प्रकल्पालाकडे जाणाऱ्या ओढ्याला पूर आला. पाऊस बंद झाल्यानंतर शिवारातील शेतकरी, शेतमजूर, महिला गावाकडे निघाल्या असता, गावानजीक असलेल्या ओढ्याला पूर आल्याचे दिसून आले. त्यांनी पाणी कमी असेल म्हणून पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक वाढत असल्याने मधाेमध काही शेतकरी, मजूर आणि महिला अडकले. त्यांना पाण्यातून सुखरुप काढण्यासाठी गावकऱ्यांसह ग्रामपंचायतीने प्रयत्न केले. त्यांना ट्रॅक्टरच्या मदतीने पुराच्या पाण्याबाहेर काढण्यात आले.
सायंकळी पाच वाजल्यापासून
दाेन्ही मार्गावरील वाहतूक बंद...
पाच वाजता अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी-एकंबी तांडा, उजनी- मासुर्डी मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. ओढ्याचा पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत हाेईल, असे ग्रामस्थांनी सांगितले. सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची, मजुरांची तारांबळ उडाली.
या गावांच्या परिसरात
झाला मुसळधार पाऊस...
औसा तालुक्यातील उजनीसह, मासुर्डी, एकंबी, तांडा, वाडी, टाका, चिंचाेली, आशिव, कमलपूर, भंडारी, ककासपूर, धुत्ता गावच्या परिसरात शनवािरी सांयकाळी मुसळधार पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आला आहे. लातूर जिल्ह्यातील काही भागात शनिवारी सकाळी आणि दुपारी माेठा पाऊस झाल्याची नाेंद आहे.