लातूरमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस; काही भागात वीज गुल
By आशपाक पठाण | Published: October 1, 2023 09:58 PM2023-10-01T21:58:26+5:302023-10-01T21:59:08+5:30
काही भागात वीज गुल झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
आशपाक पठाण, लातूर : लातूर शहर व जिल्ह्यातील काही भागात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटास पाऊस झाला. काही भागात दमदार तर काही भागात रिमझिम पाऊस झाला आहे. रात्री ८.४५ वाजेपर्यंतही रिमझिम पाऊस सुरू होता. काही भागात वीज गुल झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
उदगीर शहरात सायंकाळाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाल्याने शहराच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला. हाळी हंडरगुळी भागातही चांगला पाऊस झाला आहे. चाकूर, रेणापूर येथेही सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस जवळपास एक तास होता. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, येरोळ, डिगोळ भागात पावसाने हजेरी लावली. देवणी तालुक्यात जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला आहे. लातूर शहर व परिसरातील हरंगुळ बु., हरंगुळ खु., पाखरसांगवी, खाडगाव, वरवटी, मुरूड अकोला, चिखुर्डा, भोईसमुद्रगा आदी भागात रात्री ८.४५ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.