राज ठाकरे हाजीर हाे..! निलंगा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी
By राजकुमार जोंधळे | Published: August 31, 2024 11:04 PM2024-08-31T23:04:14+5:302024-08-31T23:04:35+5:30
निलंगा (जि. लातूर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविराेधात निलंगा न्यायालयाने २००८ मधील एका प्रकरणात सतत गैरहजर ...
निलंगा (जि. लातूर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविराेधात निलंगा न्यायालयाने २००८ मधील एका प्रकरणात सतत गैरहजर राहिल्यामुळे अटक वॉरंट जारी केले आहे.
निलंगा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात म्हटले आहे, बेकायदेशीर जमाव जमविणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, हत्यारबंदी कायद्याचे उल्लंघन करणे आदींसह इतर कलमानुसार २००८ मध्ये ईश्वर पाटील, इरफान शेख, माधव वाडीकर, वैजनाथ नाटकर, शंकर पोतदार, विक्रम पाटील, अभय सोळुंके आणि राज ठाकरे यांच्याविरुद्ध, कलम १४३, १४७, १४९, ३३६, ३५३, ३४१, ४२१, ११७, ५०४, ५०६ भादंवि, कलम ३ शासकीय मालमत्तेचे नुकसान, त्याचबराेबर कलम १३५ मुंबई पोलिस कायद्याप्रमाणे निलंगा ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. याचा तपास करुन २५ नाेव्हेंबर २००८ रोजी निलंगा पाेलिसांनी न्यायालयात यांच्याविरेाधात आरोपपत्र दाखल केले. मात्र, न्यायालयाच्या तारखेला वारंवार गैरहजर राहत असल्याने निलंगा न्यायालाने आठही जणांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, यातील सहा जणांनी न्यायालयासमोर हजर राहून वॉरंट रद्द केले. तर अभय सोळुंके आणि राज ठाकरे हे मात्र वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीन पात्र पकड वॉरंट जारी केले आहे. २० आणि २१ सप्टेंबर २०२४ राेजी वेगवेगळ्या दोन गुन्ह्यातील प्रकरणात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयने पुन्हा बजावले वाॅरंट...
मनसे प्रमुख राज ठाकरे हे यापूर्वीही न्यायालयात वारंवार गैरहजर असल्याने त्यांच्याविराेधात यापूर्वीही वॉरंट जारी केले होते. मात्र २ सप्टेंबर २०१६ रोजी निलंगा न्यायालयात हजर राहून त्यांनी आपले वॉरंट रद्द करून घेतले. मात्र, त्यानंतरही ते सतत गैरहजर राहिल्याने त्यांच्याविराेधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणातील अभय सोळुंके हे अद्याप एकदाही न्यायालयात हजर झाले नाहीत. शिवाय, वॉरंटही रद्द करून घेतला नसल्याची माहिती मिळाली.