राष्ट्रवादीकडून रमेश कराड यांना उमेवारीसाठी विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:24 AM2018-04-30T05:24:27+5:302018-04-30T05:24:27+5:30
विधान परिषदेच्या लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून, भाजपाचे रमेश कराड यांना पक्षप्रवेश देऊन निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लातूर : विधान परिषदेच्या लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून, भाजपाचे रमेश कराड यांना पक्षप्रवेश देऊन निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. जिल्हानिहाय पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपाचे २८८, राष्ट्रवादी काँग्रेस २७९, काँग्रेस १८०, शिवसेना ६१ तर इतर ९४ मतदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास निकाल आघाडीच्या बाजूने राहील, असा अंदाज बांधून राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद येथील उद्योजक अशोक जगदाळे आणि बीड येथून अमरसिंह पंडित यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस पक्षामधून दिलीपराव देशमुख यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह आहे. परंतु, पक्षाने नव्यांना संधी द्यावी, अशी भूमिका घेत दिलीपराव यांनी निवडणुकीपासून दूर राहणे तूर्त तरी पसंत केले आहे.
भाजपामध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच असून, माजी मंत्री सुरेश धस, रमेश कराड तसेच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांची नावे चर्चेत आहेत.