रेणापूरात अवैध दारुविक्री विरोधात रस्तारोको; बिटरगावचे ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:08 PM2018-05-29T17:08:41+5:302018-05-29T17:08:41+5:30
तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन विके्रत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वा़ रास्तारोको आंदोलन केले़
रेणापूर (लातूर ) : तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन विके्रत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वा़ रास्तारोको आंदोलन केले़ दरम्यान, तहसीलदारांनी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देऊनही आंदोलनकर्ते आक्रमकच होते़ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन काही वेळाने सोडून दिले़
रेणापूर तालुक्यातील बिटरगाव व परिसरात काही महिन्यांपासून अवैध दारुविक्रीचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे गावात दररोज तंटे वाढले आहेत़ मद्यपींची संख्या वाढल्याने गावातील महिला, मुली व नागरिकांना त्रास होत आहे़ त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अवैध दारुविक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी १६ एप्रिल रोजी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती़ दोन दिवसांच्या कालावधीत कुठलीही कारवाई न झाल्याने बिटरगावच्या महिला व नागरिकांनी १८ एप्रिल रोजी रेणापूर पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या़ पोलीस ठाण्यात तब्बल तासभर ठिय्याही मांडला होता़ तेव्हा नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले होते़ परंतु, प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा मंगळवारी गावातील नागरिक आक्रमक झाले़
गाव व परिसरातील अवैध दारुविक्री बंद करावी, हातभट्टी दारुचे अड्डे उध्दवस्त करावेत, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, अशा मागण्यांसाठी पिंपळफाटा येथे नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले़ हे आंदोलन दयानंद सरवदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले़ यावेळी भैय्यासाहेब सरवदे, कृष्णकांत वाघमारे, बालाजी सरवदे, शांताबाई सरवदे, सिंधूताई हानवते, मधुबाला सरवदे, रामकिशन हानवते, वसंत सरवदे, सुरेखा सरवदे, आशा वाघमारे, सुरेश वाघमारे, आम्रपाली सरवदे, सतीश हानवते, दत्ता उपाडे, पद्मीनबाई सरवदे आदी सहभागी झाले होते़
दरम्यान, आंदोलनकर्त्यांची तहसीलदारांनी भेट घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले़ परंतु, कार्यवाही केल्याशिवाय आम्ही आपले आंदोलन मागे घेत नाही, असा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता़ त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले़ काही वेळानंतर सोडून देण्यात आले़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोनि़ बी.पी. मुंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़
पाऊण तास वाहतूक ठप्प़़
पिंपळफाटा येथे हे आंदोलन करण्यात आल्याने दुपारी जवळपास पाऊणतास वाहतूक ठप्प झाली होती़ आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते़ यापूर्वीही आंदोलन केले होते़ परंतु, प्रशासन आणि पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा हे आंदोलन करावे लागत असल्याचे दयानंद सरवदे यांनी सांगितले़ अवैध दारुविक्री वाढल्याने गावात तंट्यांचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे गावात वाद होत असल्याचेही त्यांनी सांगितले़