औसा-तुळजापूर महामार्गावर छावाचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By संदीप शिंदे | Published: September 1, 2023 01:58 PM2023-09-01T13:58:13+5:302023-09-01T14:00:18+5:30

रास्तारोको आंदोलनात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.

rastaroko on Ausa-Tuljapur highway; Demand to declare drought | औसा-तुळजापूर महामार्गावर छावाचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

औसा-तुळजापूर महामार्गावर छावाचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

googlenewsNext

औसा : तालुक्यात मागील ३० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने लाखो हेक्टरवरील पिके वाळून चालली आहेत. तर महावितरण वारंवार वीजपुरवठा खंडीत करीत आहे. पाऊस नसल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विजयकुमार घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली औसा-तुळजापूर महामार्गावरील टाका पाटी येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रास्ता रोको आंदोलनात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे औसा-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. औसा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करुन प्रतिहेक्टरी १ लाखांची मदत देण्यात यावी, उजनीचे पाणी मराठवाड्याला देण्यात यावे, १७ सप्टेंबरच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे अन्यथा १८ तारखेपासून संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांची संघर्ष रथ यात्रा काढू असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात भगवान माकणे, मनोज लंगर, संजय राठोड, मनोज फेसाटे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अतुल हेळंबे, नितीन सांळुके, पांडू कोळपे, नामदेव जाधव, रमाकांत करे, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, राजू कसबे, बालाजी माळी, समाधान यादव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदविला. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

प्रतिहेक्टरी एक लाखांची मदत करावी...
मागील महिनाभरापासून तालुक्यात पाऊस नाही. खरीपातील पिके शेतात वाळून चालली आहेत. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे काेरडा दुष्काळ जाहीर करुन प्रतिहेक्टरी १ लाखांची मदत करावी, तसेच उजनीचे पाणी मराठवाड्याला देण्यात यावे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची संघर्ष रथ यात्रा काढू, असा इशाराही यावेळी अखिल भारतीय छावा संघटना विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिला आहे.

Web Title: rastaroko on Ausa-Tuljapur highway; Demand to declare drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.