बोढार, रेणापूर येथील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन
By संदीप शिंदे | Published: June 9, 2023 06:51 PM2023-06-09T18:51:28+5:302023-06-09T18:51:38+5:30
आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, त्यांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आदी मागण्यांसाठी रेणापूर येथे आंदोलन
रेणापूर : येथील गिरीधारी तपघाले व नांदेड जिल्ह्यातील बोढार-हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी रेणापूर येथील बसस्थानकासमोर फकिरा ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रेणापुर येथील गिरीधारी तपघाले यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर गावगुंडांनी हल्ला केला. तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून लोखंडी रॉड, गजाने मारहाण केली. यात गिरीधारी तपघाले यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत मिरवणूक काढली म्हणून गावगुंडांनी अक्षयची निघृण हत्या केली.
त्यामुळे या दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, त्यांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आदी मागण्यांसाठी रेणापूर येथील बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा. राजेंद्र लोदगेकर, पांडुरंग मस्के, रमेश्वर उपाडे, श्रीरंग सरवदे, विपूल तपघाले, सुदर्शन शिंदे, नंदू राऊत, संजय चिरुळे, गोविंद धबडगे, बाळू पटनुरे, संतोष पटनुरे, शरद धबडगे, राम उपाडे, प्रमोध कुडके, प्रमोद तपघाले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.