पूल बांधकामासाठी औरादमधील महामार्गावर रास्तारोको आंदोलन
By हरी मोकाशे | Published: May 8, 2023 05:45 PM2023-05-08T17:45:57+5:302023-05-08T17:46:36+5:30
आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले
औराद शहाजानी :लातूर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील औराद शहरातील शेळगीमाेड येथे तात्काळ पूल बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी साेमवारी औराद शहाजानीकरांनी महामार्गावर रास्ताराेकाे आंदोलन केले. तेव्हा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
लातूर- जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीतून जातो. या महामार्गावरील येथील चौकातील पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे काम बंद ठेवण्यात आल्याने अपघाताला निमंत्रण ठरत आहे. तसेच पर्यायी रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडल्याने सातत्याने अपघात होत आहेत.
याशिवाय, ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने महामार्गालगतच्या अनेक दुकानांत पावसाचे पाणी जाऊन व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. तेरणा नदीवरील पुलाला खड्डे पडल्याने आणि बॅरिकेट नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करीत औराद शहाजानीतील व्यापारी, नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, छावा संघटना आणि परिसरातील तगरखेडा, सावरी, शेळगी येथील नागरिकांनी रास्तारोको आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी झाले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व नागरिक एकत्र आले आणि शेळगी मोड येथील महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, छावाचे विजय घाडगे पाटील, भगवान माकणे, तुळशीदास साळुंके, राजा वलांडे, अशोक कत्ते, राजा पाटील, सतीश देवणे, दीपक थेटे, विष्णू महाराज काेळी, किरण पाटील, मदन बिरादार, रणजित सूर्यवंशी, अमोल ढोरशिंगे, व्यंकट बिरादार, सुधाकर शेटगार, विद्यासागर पाटील, अशाेक थेटे, मधु बियाणी, विलास कांबळे, शहाजान नाईकवाडे, कन्हैय्या पाटील, वैभव गाेमसाळे यांच्यासह परिसरातील विविध गावांचे लाेकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी सहभागी झाले होते.
यावेळी एमएसआरडीसीचे अभियंता अशाेक इंगळे यांनी आंदोलनकर्त्यांना लवकरच पुलाचे काम सुरू करु, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन साेडण्यात आल्याचे सपाेनि. पंकज शिनगारे यांनी सांगितले. यावेळी गुत्तेदार कंपनीचे प्रतिनिधी अभियंता माेहन कसबे उपस्थित हाेते.