बाजारभावापेक्षा अधिक दर; तरीही नाफेडच्या हातावर 'तुरी'! महिनाभरात रुपयाचीही खरेदी नाही
By हरी मोकाशे | Published: February 1, 2024 06:23 PM2024-02-01T18:23:25+5:302024-02-01T18:24:08+5:30
१० हजारांच्या पुढे भाव, नाफेडच्या केंद्रांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा
लातूर : शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य शासनाने नाफेडमार्फत यंदा बाजारभावानुसार तूर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सुरुवात केली. परंतु, महिना उलटला तरी अद्यापही एक रुपयाची खरेदी झाली नाही. त्यामुळे सध्या नाफेडच्या हातावर शेतकऱ्यांनी तुरी दिल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, नाफेडच्या केंद्रांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागून आहे.
दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला सर्वोच्च ११ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे ओढा वाढला आहे. तूर पीक हे अधिक कालावधीचे असल्याने एकाच वर्षातील खरीप व रबी हे दोन्ही हंगाम घेता येत नसल्याने शेतकऱ्यांचा तुरीकडे कल कमी झाला आहे. गत खरीपात जिल्ह्यात तुरीचा ६४ हजार ४६३ हेक्टरवर पेरा झाला होता. महिनाभरापासून तुरीच्या काढणीस सुरुवात झाली आहे. सध्या दर चांगला मिळत असल्याने बहुतांश शेतकरी तूर विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीत दररोज ७ हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे.
तूर विक्रीसाठी ४३ शेतकऱ्यांची नोंदणी...
राज्य शासनाने दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप. मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्र सुरु केले आहेत. या केंद्रावर आतापर्यंत ४३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. आणखीन नोंदणीची मुदत आहे. विशेष म्हणजे, महिनाभरात एकाही शेतकऱ्याने केंद्रावर तूर विक्री केली नाही. विशेषत: शेतकऱ्यांकडून चौकशीही केली जात नाही.
दोन दिवसांत दर वाढले...
दिनांक - बाजारातील दर - नाफेडचा दर
२० जाने. - ९७०० - ९७८४
२४ जाने. - ९८०० - ९७८४
२५ जाने. - १०००० - ९५८९
२९ जाने. - १०१५० - ९७८२
३० जाने. - १०१०० - ९८१४
३१ जाने. - ९९०० - १०१५७
१ फेब्रु. - १०००० - १०१६८
हमीभावापेक्षा ३ हजार जास्त...
केंद्र शासनाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत यंदा तुरीस ७ हजार रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. दरम्यान, बाजारपेठेत गेल्या दोन वर्षांपासून अधिक दर असल्याने राज्य शासनाने बाजारभावानुसार यंदा प्रथमच तूर खरेदीस सुरुवात केली. सध्या हमीभावापेक्षा ३ हजार रुपये अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
बाजारात मापतोल झाल्यानंतर पट्टी...
नाफेडच्या केंद्रावर नोंदणीची किचकट प्रक्रिया आहे. बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. खुल्या बाजारात शेतमालाचा मापतोल झाल्यानंतर पट्टी दिली जाते. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या केंद्राकडे जात नाहीत.
- शिवलिंग भेदे, शेतकरी.
शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना...
बाजारभावानुसार तूर खरेदीसाठी १२ केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र, महिनाभरापासून शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. आतापर्यंत ४३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी खरेदी काहीही नाही.
- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.