पाेलिस दलात ६४ जागांसाठी भरती; ५ हजार ३० जणांची हाेणार चाचणी, तारीख चुकवू नका
By राजकुमार जोंधळे | Published: June 18, 2024 01:41 PM2024-06-18T13:41:59+5:302024-06-18T13:43:09+5:30
भरती प्रक्रियेची कागदपत्र पडताळणी, शारिरीक माेजमाप व शारिरीक चाचणी ही १९ जून राेजी सकाळी ५ वाजता बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर हाेणार आहे.
लातूर : पाेलिस दलात रिक्त असलेल्या पाेलिस शिपाई, बॅण्डस्मॅन आणि पाेलिस शिपाई चालक या ६४ पदासाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून एकूण ५ हजार ३० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ही भरती प्रक्रिया बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर पहाटे ५ वाजतापासून सुरु हाेत आहे. अशी माहिती पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी साेमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
लातूर जिल्हा पाेलिस दलाच्या अस्थापनेतवरील पाेलिस शिपाई यांची ३९ पदे, पाेलिस शिपाई (बॅण्डस्मॅन) यांची पाच पदे आणि पाेलिस शिपाई चालक यांची २० अशी एकूण ६४ पदांसाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाआयटी यांच्या मार्फत पाेलिस भरती - २०२२-२३ साठी ५ मार्च ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले हाेते. दरम्यान, विविध पदासाठी एकूण ५ हजार ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भरती प्रक्रियेची कागदपत्र पडताळणी, शारिरीक माेजमाप व शारिरीक चाचणी ही १९ जून राेजी सकाळी ५ वाजता बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर हाेणार आहे. संबंधित उमेदवारांना महाआयटी यांच्याकडून प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पत्रपरिषदेला अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी गजानन भातलवंडे, पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सुधाकर बावकर, सपाेनि. दयानंद पाटील यांची उपस्थिती हाेती.
दिलेल्या तारखेलाच उपस्थित राहावे लागेल...
पाेलिस भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी, शारिरीक माेजमाप व शारिरीक चाचणी काेणत्या तारखेला हजर राहावयाचे आहे, याची माहिती प्रवेशपत्रावर उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवारांना प्रवेशपत्रांवर दिलेल्या तारखेला पाेलिस मुख्यालय, लातूर येथे हजर राहावे. दिलेल्या तारखेला कागदपत्र पडताळणी, शारिरीक चाचणीला उपस्थित न राहिल्यास उमेदवााने नंतर संधी देण्यात येणार नाही.
- साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक