लातूर जिल्हा परिषदेत सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया वेगात, दोन दिवसांत मिळणार नियुक्तीपत्र
By हरी मोकाशे | Published: August 7, 2024 06:30 PM2024-08-07T18:30:03+5:302024-08-07T18:30:38+5:30
इच्छुकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू,निवड झालेल्यांना सहा महिने विद्यावेतन
लातूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहाय्यक पदांच्या भरती प्रक्रियेस वेग आला आहे. नोंदणी केलेल्या इच्छुकांच्या कागदपत्रांची बुधवारी जिल्हा परिषदेत पडताळणी सुरु होती. दिवसभरात १०३ जणांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची छाननी करण्यात आली आहे. यात पात्र ठरलेल्यांना दोन दिवसांत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या सुशिक्षित युवकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायाच्या शोधात फिरत आहेत. बहुतांश जणांना अनुभवाअभावी व्यवसाय, नोकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे सुशिक्षत युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. आयटीआय, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने सहाय्यक म्हणून नियुक्त करीत प्रशिक्षण व रोजगार देण्यात येत आहे.
७८६ ग्रामपंचायतींत सहाय्यक पदांची भरती...
जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत एक सहाय्यक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारी नोंदणीकृत इच्छुकांना बोलावून शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
२५६ इच्छुकांच्या प्रमाणपत्रांची पाहणी...
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी वित्त विभागातील ४७, पशुसंवर्धन- ७, आरोग्य- २ आणि शिक्षण विभागातील ४६ पदांसाठी भरतीसाठी इच्छुकांच्या प्रमाणपत्रांची छाननी करण्यात आली. गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील २५६ जणांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे.
इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी...
मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि रोजगारासाठी इच्छुक सुशिक्षितांनी ऑनलाईन नोंदणी करावी. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर निवड प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवारी १०३ जणांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली.
- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.
२ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु...
योजनेअंतर्गत २ हजार ३६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत २ हजार ९८० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २७ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. इच्छुकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेत स्थळावर नोंदणी करावी.
- बालाजी मरे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास.