लातूर मनपाच्या कोंडवाड्यातील २८ पशुधनाला गोशाळेत घेण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:04 PM2024-08-03T20:04:00+5:302024-08-03T20:04:16+5:30

मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम

Refusal to take 28 livestock from Kondwada of Latur Municipality to Goshala | लातूर मनपाच्या कोंडवाड्यातील २८ पशुधनाला गोशाळेत घेण्यास नकार

लातूर मनपाच्या कोंडवाड्यातील २८ पशुधनाला गोशाळेत घेण्यास नकार

लातूर : शहरातील रस्त्यांवर मोकाट असणाऱ्या पशुधनाला पकडण्याची मोहीम मनपाने सुरू केली आहे. आतापर्यंत ३४ जनावरे पकडली असून, त्यातील चार जनावरे संबंधित पशुधन मालकाने दंड भरून सोडविले आहेत. सद्यस्थितीत कोंडवाड्यात २८ जनावरे आहेत. त्यातील ११ जनावरांचा दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी ओलांडला आहे. या जनावरांना गोशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु, जिल्ह्यातील दहा ते अकरा गोशाळा चालकांनी मनपाच्या कोंडवाड्यातील पशुधनाला घेण्यास नकार दिला आहे.

लातूर शहरात जिकडे तिकडे रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. यामुळे रहदारीला अडथळा होतो आहे. दिवसा आणि रात्रीच्या वेळी मोकाट जनावरांचा रहदारीच्या चौकात ठिय्या असतो. त्यामुळे मनपाने या जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्यांचे हे पशुधन आहे त्यांच्याकडून प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि दिवसाला पाचशे रुपये संगोपन खर्च वसूल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, ज्यांचे जनावर पकडले आहे, ते मालक कोंडवाड्याकडे फिरकत नाहीत. त्यामुळे या जनावरांना गोशाळेत पाठविण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली. परंतु, तेथेही अडचण निर्माण झाली आहे. गोशाळा चालक अडचणी सांगून पशुधनाला घेण्यास तयार नाहीत.

१६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
२१ जुलैपासून मोहीम सुरू आहे. पहिल्या दिवशी पकडलेल्या जनावरांचा कोंडवाड्यातील कालावधी पंधरा दिवसांचा झाला आहे. अशी सध्या ११ जनावरे आहेत. पशुपालक आलेले नाहीत. चार जनावरांचे मालक आले. त्यांनी दंड भरून आपले पशुधन सोडवून घेतले आहे. त्यांच्याकडून १६ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग निघेल ; मोहीम सुरूच राहणार
मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू राहणार आहे. त्यामुळे पशुधन मालकांनी आपली जनावरे रस्त्यांवर सोडू नयेत. वारंवार एकाच मालकाची जनावरे रस्त्यांवर येत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते. कोंडवाड्यातील पशुधनाला गोशाळेने घेतले नाही तर वरिष्ठ पातळीवरून पर्यायी मार्ग निघेल, असे कोंडवाडा विभाग प्रमुख रवी शेंडगे यांनी सांगितले.

कोंडवाड्यातील स्थिती
एकूण ३४ जनावरे पकडली. चार जनावरे संबंधित पशुधन मालकांनी दंड भरून सोडवून घेतले आहेत. तर दोन जनावरे आजारी असल्याने मयत झाली आहेत. सद्यस्थितीत २८ जनावरे कोंडवाड्यात आहेत. शुक्रवारी रात्री पकडण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

Web Title: Refusal to take 28 livestock from Kondwada of Latur Municipality to Goshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.