लातूरला आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 06:54 PM2020-12-17T18:54:57+5:302020-12-17T18:55:57+5:30
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यामुळे सदरील विभागीय केंद्राला मंजूरी मिळाली आहे.
लातूर : शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरला राज्य शासनाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय केंद्र मंजूर केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे सुरू झाल्यानंतर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व कोल्हापूर या पाच ठिकाणी विभागीय केंद्र स्थापन करण्यात आली होती. यातील औरंगाबाद विभागीय केंद्राचे विभाजन करून आता लातूरला स्वतंत्र विभागीय केंद्र स्थापन करण्यात आले असून, आता मराठवाड्यात दोन केंद्र असणार आहेत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यामुळे सदरील विभागीय केंद्राला मंजूरी मिळाली आहे. दरम्यान, लातूर पॅटर्नच्या सातत्यपूर्ण यशामुळे एक शैक्षणिक केंद्र म्हणून लातूर विकसित होत आहे. हे शैक्षणिक केंद्र प्रस्थापित होण्यासाठी शाळा-महाविद्यालयांबरोबरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे विभागीय कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र, शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर येथे सुरू करण्यात आलेले आहे. विविध विभागांची २५ ते ३० विभागीय कार्यालये लातूर येथे सुरू झाल्याने सर्वांगीण प्रगती होत राहिली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूरला अनेक महत्त्वाची कार्यालये याआधीच स्थापन झाली आहेत.
शैक्षणिक विकासाला गती...
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय केंद्र लातूरला मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळाचे सहकार्य मिळाल्याचा उल्लेख करीत विभागीय केंद्रामुळे लातूरच्या शैक्षणिक विकासात भर पडणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.