आरटीई प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २३८ शाळांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:13 AM2021-02-22T04:13:15+5:302021-02-22T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील २३८ शाळांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक लातूर तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात जवळपास दोन हजारांहून अधिक जागा आरटीई प्रक्रियेद्वारे भरल्या जातात. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी अंतिम तारीख असली तरी अद्यापही पोर्टलवर अडथळे येत असल्याने ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ५ ते ६ मार्च दरम्यान एकच सोडत काढली जाणार आहे. ९ ते २६ मार्चदरम्यान कागदपत्रांची पडताळणी होणार असून, रिक्त राहिलेल्या जागांवर २७ मार्चनंतर प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश होणार आहेत. शाळांच्या नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर युआरसी वन १५, लातूर युआरसी दोन ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ अशा एकूण २३८ शाळांनी नोंदणी केली आहे.
अर्ज भरण्यास पुरेसा अवधी मिळणार
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दरवर्षी जागा भरल्या जातात. यावर्षी वेळापत्रक जाहीर झाले असले तरी काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरू झालेली नाही. लवकरच अर्जाची प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज भरण्यास पुरेसा अवधी पालकांना दिला जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
राज्यस्तरावर एकच सोडत निघणार
मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी आरटीईसाठी राज्यस्तरावर एकच सोडत निघणार आहे. वेळापत्रकानुसार ५ ते ६ मार्च दरम्यान सोडत काढली जाणार होती. मात्र अर्ज भरण्यास दिली जाणारी मुदत पाहता सोडतही उशीरा निघेल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. तर ज्या जागा रिक्त राहतील, त्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.