देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट 

By आशपाक पठाण | Published: February 24, 2024 06:53 PM2024-02-24T18:53:45+5:302024-02-24T18:54:04+5:30

परिवन विभागाच्या सूचना : एका व्यक्तीच्या नावाने एकाच वाहनाची होणार नोंदणी.

Registration of BH series across the country is complicated | देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट 

देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट 

लातूर : बीएच मालिकेत वाहनाला नंबर मिळविण्यासाठी आता नवीन क्लिष्ट प्रक्रियेला वाहनधारकांना सामोर जावे लागणार आहे. शिवाय, एका व्यक्तीला एकच वाहनाची नोंद करता येणार आहे. यासाठी काढण्यात आलेल्या २६ ऑगस्ट २०२१ च्या अध्यादेशात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कंपनीचे चार राज्यातील कार्यालय, बदलीची शक्यता, वाहन घेण्याची ऐपत आदी गोष्टी पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खाजगी संस्थेतील तथा शासकीय सेवेतील वाहनधारक जे दावा करतात की त्यांच्या शासकीय / खाजगी कंपनीचे कार्यालय विविध राज्यात आहे, अशा वाहनधारकांकडून मागील विविध राज्यातील वास्तव्याचा दाखला, वेतन देयके, ज्या कंपनीत अर्जदार कामाला होता, तो आता आहे की नाही याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार राज्यात शाखा व इतर राज्यात बदली होऊ शकते, यापूर्वी इतर राज्यात काम केले का याबाबतची तपासणी केल्यावर बीएच सीरीजमध्ये नोंदणी करावी, केवळ इतर राज्यात बदली होऊ शकते असे नमूद करीत अर्ज आल्यावर त्याची नोंदणी करू नये, असेही आदेशात म्हटले आहे.

वाहनाची रक्कम अदा केल्याचा पुरावा...

बीएच क्रमांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या बँक खात्यातून वाहन खरेदीसाठी रक्कम अदा केली किंवा कर्ज प्रकरण असल्यास वितरकास दिलेल्या रकमेचा पुरावा तपासणे. त्यात विसंगती आढळून आल्यास अर्ज नाकारण्यात यावा. २५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चार चाकी, २ लाखांपेक्षा जास्तीची दुचाकी बीएच क्रमांकासाठी आली तर वाहनधारकाचे आयटी रिटर्न, खात्याचे विवरण तपासावे, संबंधित वाहनधारकाची खरोखरच ते वाहन खरेदी करण्याची ऐपत आहे की याची तपासणी करावी, अशा सूचना प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा दलातील जवानांचे केवळ ओळपत्र...
बीएच नोंदणीसाठी भारतीय सुरक्षा दलातील जवानांचे केवळ ओळखपत्र घेऊन नोंदणी करावी, त्यांना इतर कागदपत्रांची मागणी करू नये. या सिरीजमध्ये नोंदणी केलेल्या वाहनधारकांनी दर दोन वर्षांनी कर भरला आहे की याची तपासणी करावी. पुढील कालावधीचा कर न भरल्यास मागणीपत्र पाठवावे, कर भरणा न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले.

Web Title: Registration of BH series across the country is complicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.