शेतकऱ्यांना दिलासा! माथाडी कामगारांचा संप मिटल्याने पाचव्या दिवशी आडत बाजारात सौदा
By हरी मोकाशे | Published: February 28, 2024 06:52 PM2024-02-28T18:52:04+5:302024-02-28T18:52:53+5:30
माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला होता.
लातूर : हमालीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी बेमुदत संप पुकारला होता. दरम्यान, मंगळवारी बैठक होऊन बाजार समितीने दरवाढीचे आश्वासन देल्याने कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बुधवारी शेतमालाचा सौदा निघाला. आवक आणि दर मात्र स्थिर राहिल्याचे पहावयास मिळाले.
सध्या रबी शेतमालाचा हंगाम सुरु आहे. हरभरा, तूर आणि सोयाबीनची सर्वाधिक आवक होत आहे. दरम्यान, माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे आडत बाजार बंद राहिला. परिणामी, शेतकऱ्यांची अडचण झाली. ती दूर करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन मंगळवारी माथाडी कामगारांची बैठक घेतली आणि सकारात्मक चर्चा करीत हमालीत वाढ करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागून घेतली. त्यास माथाडी कामगारांनी प्रतिसाद देत बुधवारपासून आडत बाजार सुरु राहिले, असे सांगितले. त्यामुळे पाचव्या दिवशी शेतमालाचा सौदा निघाला.
बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक...
बाजार समितीत बुधवारी सर्वाधिक आवक सोयाबीनची झाली. ८ हजार ६८९ क्विंटल आवक झाली. कमाल दर ४ हजार ६५०, किमान ४ हजार ४३० तर सर्वसाधारण भाव ४ हजार ५३० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. हरभऱ्याची ७ हजार ९६४ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण भाव ५ हजार ८०० रुपये मिळाला. तसेच तुरीची आवक २ हजार ७५२ क्विंटल आवक होऊन साधारण भाव १० हजार १०० रुपये मिळाला.
रबी ज्वारी ३ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल...
रबी ज्वारीची १९४ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण भाव ३ हजार ५५० रुपये असा मिळाला. गूळ - ३३२०, गहू- २८००, हायब्रीड- २०००, पिवळी- ५०००, बाजरी - २८००, करडई- ४३००, राजमा- ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटला असा भाव होता.