लातूरकरांना दिलासा! तांत्रिक अडथळा दुर, उद्या सकाळपासून सुरळीत होणार पाणीपुरवठा
By संदीप शिंदे | Published: January 19, 2023 06:24 PM2023-01-19T18:24:32+5:302023-01-19T18:25:31+5:30
नांदेड नाका, शासकीय कॉलनी, राजधानी जलकुंभावरुन उद्या पाणी वितरण
लातूर : वारंवार तांत्रिक बिघाडामुळे लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत आहे. बुधवारी हंरगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद होता. बुधवारी रात्री उशिरा तांत्रिक अडथळा दुर झाल्याने पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून नांदेड नाका, शासकीय कॉलनी, राजधानी आणि कम्युनिटी हॉल येथील जलकुंभावरुन पाणी वितरण होणार आहे.
लातूर शहरामध्ये ११ जलकुंभावरुन पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाने प्रस्तुत केले आहे. परंतू, मंगळवारी हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बिघाड झाला होता. त्यामुळे बुधवार आणि गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा ठप्प होता. आता तांत्रिक दुरुस्ती पुर्ण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पुर्ववत झाला आहे. नांदेड नाका येथील जलकूंभावरुन बरकत नगर, मळवटी रोड, महादेव नगर भागात पाणीपुरवठा होणार आहे. तर शासकीय कॉलनी येथील जलकुंभावरुन दिपज्योती नगर, हडको, चौधरी नगर, विकास नगर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा होईल. तर कम्युनिटी हॉल परिसरातील जलकुंभावरुन माताजीनगर, मंत्रीनगर, गोपाळनगर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय, राजधानी जलकुंभावरुन शिवनगर, गांधीनगर, मोतीनगर आदी भागामध्ये पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी वितरणाचे प्रमुख जलील शेख यांनी दिली.
मांजरा प्रकल्पातून दररोज ५० एमएलडी पाणी...
मांजरा प्रकल्पातून दररोज लातूर शहरासाठी ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण झाल्यानंतर जलकुंभनिहाय पाण्याचे वितरण होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रावरचा रात्री दुरुस्त झाल्यावर लागलीच मांजरा प्रकल्पातून पाणी उचलण्यात आले, असेही पाणी वितरण प्रमुख जलील शेख यांनी सांगितले. ५० ते ६० एमएलडी पाणी उचलून त्यापैकी गळती आणि शुद्धीकरणावरील गळती लक्षात घेता ४० ते ५० एमएलडी पाणी शहरात दररोज वितरीत होते.