पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Published: July 22, 2024 05:27 PM2024-07-22T17:27:02+5:302024-07-22T17:27:19+5:30

प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा

Relief from rain; 31 percent water storage in Rena project of Latur! | पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा !

पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा !

रेणापूर : तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाच्या परिसरात मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने ३१.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाची एकूण क्षमता २१.८० दलघमी असून, सोमवारपर्यंत प्रकल्पामध्ये ३१.१५ टक्के जलसाठा झाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास रेणापूर तालुक्यातील सिंचनासह पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार आहे. मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील अर्ध्या गावांची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवतो. या प्रकल्पावर शेतकरी व नागरिक अवलंबून आहे. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प हा सर्वांच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचा आहे.

रेणा मध्यम प्रकल्पात ७ जुनपर्यंत फक्त १.५ टक्का जलसाठा होता. गतवर्षी तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला. तसेच दरवर्षी परतीच्या पावसामध्ये मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून रेणा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. मात्र, गतवर्षी पावसाळा आणि परतीचा पाऊस न झाल्याने प्रकल्पातील साठा जेमतेम राहिला होता. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला होता. त्याचबरोबर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे व पाणीपुरवठा योजनेसाठी उपसा केल्याने या मध्यम प्रकल्पात केवळ १.५ टक्के जलसाठा होता. तालुक्यात प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पाऊसाने प्रकल्पात पाण्याची २१ टक्क्याने वाढला होता. त्यानंतर अधून-मधून पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यातही वाढ होत गेली. सद्यस्थिती ३१.१५ टक्के साठा असून, ९ ते १० महिने हा साठा पाणीपूरवठा योजनांसाठी चालू शकतो. मात्र, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता असून, शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

प्रकल्पात असा झाला जलसाठा...
रेणा मध्यम प्रकल्पात १० जुनला २ टक्के वाढून पाण्याची टक्केवारी ३.४० टकके, ११ जुनला १६ टक्के, १२ जुन रोजी पाण्याची टक्केवारी २१ वर पोहचली होती. १० जुलैला २३.१५ व २१ जुलैला २४.४७ टक्के जलसाठा झाला होता. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा वेग वाढल्याने सोमवारी ३१.१५ टक्के एकूण प्रकल्पात जलसाठा झाला आहे. गेल्या आठवड्याभरात प्रकल्प क्षेत्रामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सोमवारपर्यंत ३१ टक्के साठा असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थिती...
रेणा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ६.४०० दलघमी असून, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी आहे. एकूण पाणीसाठा ७.५३० दलघमी असून, पाण्याची टक्केवारी ३१.१५ टक्के आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील शेतीचे गणित अवलंबून असून, अनेक गावांना प्रकल्पाचा आधार आहे. जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात चांगला पाऊस पडत असल्याने लवकरच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी माेठ्या पावसाची गरज असून, अद्याप काही नद्यांचे पात्र कोरडेच आहे.

Web Title: Relief from rain; 31 percent water storage in Rena project of Latur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.