उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना दिलासा; रेणापूरमध्ये विक्रमी १६० मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 01:50 PM2017-09-13T13:50:31+5:302017-09-13T13:50:31+5:30
उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
लातूर, दि. 13- उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली़. रेणापूर आणि लातूर परिसरात अतिवृष्टी झाली असून रेणापूरमध्ये विक्रमी १६० मिमी पाऊस झाला़. तर लातूर महसूल मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
जिल्ह्यातील निलंगा, औसा, देवणी, अहमदपूर, चाकूर तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून प्रचंड उन्ह आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होते़. मंगळवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला़. लातूर शहरात मंगळवारी रात्री तसेच बुधवारी पहाटे साडेपाच वा़जेपासून सकाळी साडेआठ वा़जेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप आले होते. तसेच मुख्य रस्त्यावरही पाणी साचल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती़ रेणापूर तालुक्यातील रेणापूर महसूल मंडळात १६०, पोहरेगाव- २०, कारेपूर ३९, पानगाव- ३० मिमी पाऊस झाला़ लातूर महसूल मंडळात ६७, बाभळगाव- १४, हरंगुळ- २२, कासारखेडा- ४८, मुरुड- ४१, गातेगाव- ६, तांदुळजा- ४५, चिंचोली २१ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. औसा तालुक्यातील बेलकुंड, आलमला, नांदुर्गा, गुबाळ, मंगरुळ भागात चांगला पाऊस झाला़ देवणी तालुक्यात देवणीसह परिसरात पावसाने हजेरी लावली़.