दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 19:45 IST2025-01-25T19:45:20+5:302025-01-25T19:45:35+5:30

४८ कोंबड्यांचे नमुने संकलित करून औंध येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

Relief! Report of chickens in Udgira negative, no bird flu infection | दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही

दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही

लातूर : उदगिरात कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. तसेच कावळे मृतावस्थेत आढळलेल्या ठिकाणांच्या ५ किलोमीटर परिघातील सर्व कुक्कुट फार्म, चिकन सेंटर आणि पक्ष्यांशी संबंधित ठिकाणांची तपासणी केली. या ठिकाणांहून ४८ कोंबड्यांचे नमुने संकलित करून औंध येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल बर्ड फ्लू निगेटिव्ह आला आहे.

उदगिरातील हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय, महात्मा गांधी उद्यान व पाण्याच्या टाकी परिसरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी तातडीने या परिसराच्या १० किलोमीटर परिघात अलर्ट झोन घोषित केला. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. त्यानुसार या परिसरातील ५ किलोमीटर परिघातील कोंबड्यांचे ४८ नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल बर्ड फ्लूसाठी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे उदगिरातील पशुपालक व नागरिकांनी घाबरू नये. शिजवून चिकन, अंडी सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहून परिसरात कोणत्याही पक्ष्यांचा अनैसर्गिक मृत्यू आढळून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सर्व कोंबडी पालकांनी शेतीतील स्वच्छता व जैवसुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी घाबरू नये
उदगीरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची बाधा नसल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. योग्य स्वच्छता पाळून चिकन, अंडी सेवन करणे सुरक्षित आहे.
- डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.

Web Title: Relief! Report of chickens in Udgira negative, no bird flu infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.