जमिनीचा फेर ओढण्यास टाळाटाळ, शेतकऱ्याने संपवले जीवन; तलाठ्यावर गुन्हा दाखल
By हरी मोकाशे | Published: February 1, 2023 05:07 PM2023-02-01T17:07:25+5:302023-02-01T17:08:11+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल
रेणापूर : वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रानंतर जमिनीचा फेर ओढण्यासाठी सहा महिने पाठपुरावा करुनही तलाठ्याकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्याने आर्थिक संकटातील एका शेतकऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ जानेवारी रोजी तालुक्यातील मोटेगाव शिवारात घडली होती. याप्रकरणी बुधवारी त्या तलाठ्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मोटेगाव येथील दत्ता विनायक सोमवंशी (२८) यांची मोटेगावात वडिलोपार्जित जमीन होती. या जमिनीचे वाटणीपत्र झाले. त्यानुसार फेर ओढण्यासाठी दत्ता सोमवंशी यांनी तलाठ्याकडे कागदपत्रांची पूर्तता केली. तेव्हा तलाठ्याने पैशाची मागणी केली. पैश्याशिवाय फेर मंजूर करणार नाही, असे सांगितले. तेव्हा दत्ता सोमवंशी यांनी तलाठ्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. तेव्हा संबंधित तलाठ्याने वरिष्ठांकडे तक्रार का केलीस म्हणत धमकी दिली.
त्यामुळे दत्ता सोमवंशी हे त्रस्त झाले आणि २७ जानेवारी रोजी शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मयताचा भाऊ महेश सोमवंशी यांनी २७ जानेवारी रोजीच रेणापूर पोलिसांत दिली होती. मात्र, सुरुवातीस आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अखेर बुधवारी तलाठी विष्णू गोविंद तिडके यांच्याविरुध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिपक शिंदे हे करीत आहेत.