काळ्या पैशाबाबत श्वेतपत्रिका काढा; काँग्रेसच्या मोर्चात मागणी
By admin | Published: January 6, 2017 09:17 PM2017-01-06T21:17:19+5:302017-01-06T21:17:19+5:30
नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 6 - नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहेत, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहर जिल्हा काँगे्रसच्यावतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नोटाबंदीनंतर देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावर पंतप्रधानांचे मौन आहे. सर्वसामान्य जनतेवर नोटबंदीचा परिणाम झाला असताना उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आहेत मागण्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी.
- नोटाबंदी नंतर जिल्ह्यात काळा पैसा उघडकीस आला आहे का? असल्यास कोणाचा किती पैसा आहे, ते जाहीर करण्यात यावे.
- जिल्ह्यात किती एटीएम आहेत? त्यातील किती एटीएम २४ तास सुरू आहेत?
-जिल्ह्यातील एटीएम व बँकेसमोरच्या रांगा संपल्या आहेत का? रांगा संपल्या नसतील तर जबाबदारी कोणाची आहे.
- नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने पूर्ण होत असताना आजूनही बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा कायम का आहेत? आदी प्रश्नांची उत्तरे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सरकाराला काँग्रेसने विचारली आहेत.