रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By राजकुमार जोंधळे | Published: September 13, 2022 11:40 AM2022-09-13T11:40:41+5:302022-09-13T11:41:11+5:30
रेणा धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.
रेणापूर ( जि. लातूर) : रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमवारी सांयकाळच्या सुमारास धरणाचे पुन्हा दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन्ही दरवाजांमधून नदीपात्रात १७.७५ क्युमेक्स (६२६.७५ क्युसेक ) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून पाणी सोडण्याची ही आठवी तर सप्टेबर २०२२ या महिन्यातील १२ दिवसात प्रकल्पाचे दरवाजे सहा वेळा उघडण्याची वेळ आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकूण १४ वेळा दरवाजे उघडून रेणा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, नदीकाठावरील शेतकरी आणि नागरिकांनी सर्तक राहवे, असे आवाहन रेणापूर येथील तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी केले आहे.
रेणा धरणाची पाणीपातळी सध्या ६०८.४६ मी (आरएल) एवढी आहे. रेणा धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीपात्रात कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. नदीकाठवर असलेल्या शेतकऱ्यांनी, नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे.
पाटबंधारे विभाग लातूर क्रमांक ७ चे उपविभागीय अभियंता एस. एम. निटूरे, प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक एस. पी. डब्बे याच्यासह अन्य कर्मचारी रेणा मध्यम प्रकल्पावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.