रेणापूर खून प्रकरण : निष्काळजीपणा आला अंगलट; पाेलिस निरीक्षकांची उचलबांगडी
By राजकुमार जोंधळे | Published: June 9, 2023 11:30 PM2023-06-09T23:30:00+5:302023-06-09T23:30:12+5:30
तीन निलंबित, तर तिघांची नियंत्रण कक्षात बदली...
लातूर : तीन हजारांच्या कर्जापाेटी सावकारासह इतरांनी जबर मारहाण करीत गिरीधारी तपाघाले यांचा खून केल्याची घटना रेणापूर येथील राजेनगर येथे घडली हाेती. या प्रकरणात पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रेणापूरचे पाेलिस निरीक्षक डी. डी. शिंदे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. यातील तिघांची नियंत्रण कक्षात बदली, तर तिघांना निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले.
पाेलिसांनी सांगितले, रेणापूर येथील राजेनगर येथील मृत गिरीधारी तपघाले (वय ५०) हे आपली पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्याला हाेते. दरम्यान, त्यांनी शुक्रवारी (दि.२ जून) सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण मार्कंड व त्याचा भाचा प्रशांत दशरथ वाघमाेडे हे गिरीधारी तपघाले यांच्या घरी आले. त्यावेळी लक्ष्मण मार्कंड याने पैशावरून वाद घातला. आताच्या आता माझे पैसे दे म्हणून त्याने लाेखंडी राॅडने गिरीधारी तपघाले यांच्या हातावर, पायावर मारून जखमी केले.
शिवाय, भाचा प्रशांत वाघमाेडे यानेही काठीने जबर मारहाण केली. जखमी झालेल्या गिरीधारी यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रेणापूर पाेलिस ठाण्यात लक्ष्मण मार्कंड आणि त्याचा भाचा प्रशांत वाघमाेडे यांच्याविराेधात शुक्रवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये, ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. मात्र, शनिवारी पहाटे उपचारांदरम्यान गिरीधारी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाेलिसांनी दाेन्ही आराेपीविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
चालढकलपणाने घेतला गिरीधारी तपघालेचा बळी...
गिरीधारी तपघाले खून प्रकरणात रेणापूर पाेलिसांनी केलेला निष्काळजीपणा चाैकशीमधून आता समाेर आले आहे. आराेपींवर वेळीच कारवाई केली असती तर गिरीधारी तपघाले यांची हत्या झाली नसती. मात्र, पाेलिसांनी केलेल्या चालढकलपणामुळे आराेपींनाच पाठबळ मिळाल्याचा आराेप सामाजिक संघटनांनी केला आहे.
पाेलिस निरीक्षक डी. डी. शिंदे यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली...
रेणापूर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक डी. डी. शिंदे यांच्यासह अन्य दाेघा कर्मचाऱ्यांची मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तर अन्य तिघा पाेलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांनी निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर केल्याचे समाेर आल्याने ही कारवाई केली आहे. रेणापूर पाेलिस ठाण्याचा पदभार अहमदपूर येथील पाेलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
- साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर.