गोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद
By हरी मोकाशे | Published: September 24, 2022 06:59 PM2022-09-24T18:59:37+5:302022-09-24T19:00:58+5:30
पिंपळफाटा येथे शेतकऱ्यांचा अर्धा तास ठिय्या
रेणापूर (जि. लातूर) : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीची भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांच्यावतीने रेणापुरात बंदचे आवाहन करण्यात आले. त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. दरम्यान, शेतकऱ्यांनी पिंपळफाटा येथे अर्धा तास ठिय्या आंदोलन केले.
रेणापूर तालुक्यात खरिपातील सोयाबीचे पीक चांगले उगवले होते. त्यामुळे चांगले उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे उगवलेल्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. परंतु, सतत गोगलगायींचा प्रादुर्भाव होत राहिला. त्यातच अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण पिकास फटका बसला.
दरम्यान, प्रशासनाने गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील ३ हजार ३१५ शेतकऱ्यांच्या शेतातील २५०० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे दाखविले आहे. ही शेतकरी संख्या आणि क्षेत्र संपूर्णपणे चुकीचे आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पंचनामे केले नाहीत. त्यामुळे आम्ही वारंवार ताेंडी तक्रारी, लेखी निवेदने दिली. परंतु, वास्तविक पंचनामे करण्यात आले नाहीत.
शासनाने तालुक्यातील केवळ ३ हजार ३१५ शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. ती आम्हा शेतकऱ्यांस मान्य नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे असल्यास सरकारने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
गोगलगाय अनुदानात तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. तो दूर करावा. येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
या आंदोलनात संजय इगे, बालाजी कदम, बाळासाहेब कातळे, सचिन मोटेगावाकर, राजन हाके, अजय औसेकर, रफिक सय्यद, शरद दरेकर, प्रकाश जाधव, रमाकांत वाघमारे, दशरथ मेकले, बळीराम मुंगे, समाधान गाडे, श्रीपाल बस्तापुरे, विश्वनाथ गायकवाड, ॲड. देविदास कातळे, जी.एम. उटगे, राम पाटील, अतुल कातळे, सोनू उरगुंडे ,धनराज भांबरे, सतीश माने, दिलीप अकनगिरे, सचिन इगे, गणेश कलशेट्टी आदी शेतकरी सहभागी झाले होते.