जीर्ण जलकुंभ पाडा; रेणापूर तालुक्यातील हरवाडीकरांचे जलकुंभावर चढून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:29 PM2018-12-04T17:29:12+5:302018-12-04T17:30:42+5:30
हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़
रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील हरवाडी येथील पाणीपुरवठ्याचे जलकुंभ जीर्ण झाले आहे़ ते कधीही कोसळण्याची भिती आहे़ त्यामुळे हे जलकुंभ पाडण्यात यावे, अशी वारंवार मागणी करण्यात आली असतानाही त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करीत गावक-यांनी मंगळवारी जलकुंभावर चढून आज आंदोलन केले़.
रेणापूर तालुक्यातील हरवाडी गावास पाणीपुरवठ्यासाठी ५० वर्षांपूर्वी जलकुंभ बांधण्यात आला़ सध्या हा जलकुंभ जीर्ण अवस्थेत आहे़ काही दिवसांपूर्वी जलकुंभाचा काही भाग ढासळून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता़ जीर्ण अवस्थेमुळे या जलकुंभाचा वापर बंद करण्यात आला आहे़ दरम्यान, हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनास निवेदने दिली होती़ परंतु, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून त्याची दखल घेण्यात आली नाही़ दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्यात येऊन या जलकुंभामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे ते पाडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली़
प्रशासनाकडून त्याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेले नागरिक मंगळवारी सकाळी १०़३० वा़ च्या सुमारास जलकुंभावर चढून उपोषण, आंदोलन सुरु केले आहे़ दरम्यान, दुपारी ३़३० वा़ जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे सांगितल्याने गावकºयांनी आपले आंदोलन मागे घेतले़
प्रशासनाच्या कारभारावर संताप
गावातील जीर्ण जलकुंभ पाडावे, अशी वारंवार मागणी केली जात आहे़ परंतु, त्यास प्रशासनाकडून दाद देण्यात येत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आणि संताप व्यक्त केला़ या आंदोलनात उपसरपंच हणमंत कातपूरे, गोविंद ढोरमारे, अशोक गंगथडे, सतीश चोथवे, गणेश गंगथडे, सतीश माने, शिवाजी भंडे, दीपक चोथवे, नानासाहेब माने, मच्छिंद्र माने, दादाराव शिवणकर, चंद्रकांत माने आदी सहभागी झाले होते़ दरम्यान, जि़प़ सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले़
गावकरी पाच तास जलकुंभावऱ़
मंगळवारी सकाळी १०़३० वा़पासून गावकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ ते दुपारी ३़३० वा़ मागे घेण्यात आले़ दरम्यान, या आंदोलनास ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी, भारतीय जनता पार्टी, संभाजी सेना, यशवंत सेना, महाराष्ट्र विकास आघाडी, एस.आर.ग्रुप खरोळा आदींनी पाठिंबा दर्शविला़