लातूर जिल्ह्यातून अपहरण झालेल्या १३ अल्पवयीन मुलींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:08 PM2022-08-02T16:08:10+5:302022-08-02T16:08:51+5:30
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी
लातूर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या १३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांची उकल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली असून, यात १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे.
जिल्हा पोलीस दलामध्ये नव्यानेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्याची माहिती घेतली. राज्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन तपास केला असता १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. सहा तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आठ बालकामगारांचीही मुक्तता करण्यात कक्षाने यश मिळविले आहे.
तरुण मुलींना पळवून आणून त्यांना अवैध धंद्यात गुंतविले जाते. मुलांचे अपहरण करून इतर भागांत पाठवून बेकायदेशीर कामाला लावले जाते. यावर आळा घालण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षाने आतापर्यंत १३ अल्पवयीन मुलींची व आठ बालकामगारांची सुटका केली आहे, अशी माहिती महिला पोलीस उपनिरीक्षक श्यामल देशमुख यांनी दिली.
या कक्षामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, महिला अंमलदार वंगे, लता गिरी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, निहाल मणियार हे कार्यरत आहेत.