हाॅटेलमधील बाल कामगारांची सुटका; चालकांविराेधात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: July 3, 2024 09:09 PM2024-07-03T21:09:00+5:302024-07-03T21:09:49+5:30
पाेलिसांनी दाेघा बालकामगारांची सुटका केली आहे.
राजकुमार जाेंधळे, लातूर: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, लातूरच्या वतीने (एएचटीयू) बालकांना कामगार म्हणून ठेवणाऱ्या दाेघा हॉटेल चालकांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दाेघा बालकामगारांची सुटका केली आहे.
पाेलिसांना काही आस्थापनांत बालकांचा कामगार म्हणून वापर करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या दाेन हाॅटेलवर छापा टाकण्यात आला. यावेळी १४ आणि १५ वर्षीय उत्तर प्रदेशातील दाेन बालकांना कामगार म्हणून ठेवल्याचे आढळून आले. दोन्ही बालकांची सुटका करुन, त्यांची रवानगी बालगृहात करण्यात आली. याप्रकरणी गांधी चौक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. चित्तलवाड करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक दयानंद पाटील, पाेउपनि. सुभाष सूर्यवंशी, सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुदामती वंगे, लता गिरी, चालक मणियार, चाईल्ड लाईनच्या अलका सन्मुखराव यांच्या पथकाने केली.
बालकामगार ठेवणे कायद्यानुसार गुन्हा...
१८ वर्षाखालील बालकास स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, वस्तू, सेवांची विक्री करण्यासाठी आणि नोकरीच्या उद्देशाने स्वतःच्या आस्थापनेत गुंतवून ठेवणे, बालकाला गुलाम म्हणून वागविणे, बालकाची कमाई रोखून ठेवणे, बालकाच्या कमाईचा स्वतःच्या हेतूसाठी वापर करणे, बालकांकडून शारीरिक श्रम करून घेणे आदी प्रकरणी बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ आणि बाल, किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अन्वये संबंधित आस्थापनाच्या चालकांविराेधात कारवाई करण्याची तरतूद आहे.