निवासी डॉक्टर बेमुदत संपावर; विविध मागण्यांसाठी आंदोलन, अत्यावश्यक आरोग्यसेवा देणे सुरु
By हरी मोकाशे | Published: February 22, 2024 08:51 PM2024-02-22T20:51:34+5:302024-02-22T20:52:01+5:30
डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी ही एक महत्त्वाची मागणी
हरी मोकाशे, लातूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून दैनंदिन आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी, निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे केंद्रीय संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे आदी मागण्यांसाठी मार्डने ७ फेब्रुवारी रोजी संप पुकारला होता. दरम्यान, राज्य शासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे संप मागे घेण्यात आला. १५ दिवस उलटले तरी अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याने निवासी डॉक्टरांनी आक्रमक पावित्रा घेत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपासून बेमुदत संप सुरु केला आहे. आंदोलनात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष डॉ. महेश हामंद, उपाध्यक्ष डॉ. अखिल देव, सहउपाध्यक्ष ऋषभ सिंह, सचिव डॉ. नारायण काबरा, डॉ. सुशांत देशमुख, डॉ. प्रतीभा होनशेट्टे, संयुक्त सचिव डॉ. शुभम कांबळे आदी सहभागी झाले आहेत.
काळ्या फिती लावून कामकाज...
गुरुवारी सायंकाळी मार्डच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आहे. शासनाने तात्काळ मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली.
१८० डॉक्टर आंदोलनात...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १८० निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप सुरु केला आहे. निवासी डॉक्टर केवळ अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात सहभागी होणार आहेत. नियमित रुग्ण तपासणी, बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण तपासणी करणार नाहीत. तसेच सध्या विद्यापीठीय परीक्षा सुरु आहेत. त्यावरही आमचा बहिष्कार आहे.
- डॉ. महेश हामंद, अध्यक्ष, मार्ड.