पाकिस्तानच्या तुरुंगातील पतीला सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:40 PM2017-09-19T20:40:47+5:302017-09-19T20:44:19+5:30
गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या.
लातूर : गेल्या २० वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात छळ सोसणाºया माझ्या पतीला सोडवा, असा आर्त टाहोे फोडत जम्मू-काश्मीरमधील विष्णूदेवींनी लातुरात आपल्या व्यथा मांडल्या. त्यांच्यासमवेत पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या आरोपात जेल भोगलेल्या १५ जणांनी सांगितलेले अनुभवही अंगावर शहारे आणणारे होते.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या पुढाकारातून पाकिस्तानात जेल भोगून आलेल्या भारतीय नागरिकांचा सन्मान सोहळा लातूरमध्ये आयोजिण्यात आला होता. तद्नंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या जम्मू-काश्मीर, पंजाब व राजस्थानमधील १५ पीडित व त्यांच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपल्या वेदना सांगितल्या.
जेल भोगून आलेले पंकजकुमार, सुनील, रामलाल, बाबुराम, डॅनियल तसेच ज्यांचे वडील जेल भोगून पाकिस्तानातच मृत्युमुखी झाले त्यांचा मुलगा सुरेंद्र यांच्या व्यथा मन सुन्न करणाºया होत्या.
आम्ही का व कसे पाकिस्तानात गेलो हे सरकारने शोधावे, असे आव्हान देत पंकजकुमार म्हणाला, मी पाकिस्तानची जेल भोगली. आमच्यावरील अन्यायाचा छडा लावावा. आम्हाला व आमच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. मदत करावी, असेही ते म्हणाले. माझे पती पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत म्हणून माझ्या जावयाने मुलीला छळले. तिचे नांदणेही उठले. अजून किती डागण्या सोसणार, असेही विष्णूदेवी म्हणाल्या.
मानवाधिकार कार्यकर्ते प्रदीप पाटील खंडापूरकर म्हणाले, हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये शेकडो भारतीय छळ सोसत आहेत. ५६० जणांनी शिक्षा भोगली आहे. अनेक जण आमच्यासोबत आहेत. त्यांच्या वेदना कागदावर घ्या, त्यांना मदत करा व ज्यांचे नातलग आजही तुरुंगामध्ये खितपत आहेत, त्यांना सोडविण्यासाठी पुढाकार घ्या, अशी आमची मागणी आहे. २२ राज्यांत मोर्चे काढले, जंतरमंतरवर १७ वेळा आंदोलन केली. तरी न्याय मिळत नसेल, तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही खंडापूरकर म्हणाले.
हमारे मन की बात सूनों...
टिष्ट्वटला उत्तर देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ साºया देशाला सांगतात. कधी तरी हमारे मन की बात सूनों, अशी वेदना मांडत विष्णूदेवी म्हणाल्या, पाकिस्तान म्हणते माझ्या पतीने हेरगिरी केली. भारत सरकारकडे त्याची नोंद नाही. मग माझे पती कोठे गेले? पूर्वी मला त्यांचे पाकिस्तानमधून पत्र येत होते. गेल्या वर्षभरात तेही येत नाहीत. मुलांना मी कसे तरी सांभाळले, आता तरी माझी मदत करा.