लातूर जिल्ह्यात आरटीईसाठी प्रतिसाद वाढला; २१७३ जागेसाठी आले ६५४५ विद्यार्थ्यांचे अर्ज!
By संदीप शिंदे | Updated: February 3, 2025 11:37 IST2025-02-03T11:37:21+5:302025-02-03T11:37:40+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत प्रतिसाद वाढला; आता राज्यस्तरीय सोडतीकडे पालकांचे लक्ष

लातूर जिल्ह्यात आरटीईसाठी प्रतिसाद वाढला; २१७३ जागेसाठी आले ६५४५ विद्यार्थ्यांचे अर्ज!
लातूर : आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या वर्षांत २०६ शाळांमध्ये २१७३ जागा असून, रविवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. तोपर्यंत ६ हजार ५४५ अर्ज दाखल झाले असून, आता राज्यस्तरावर सोडत कधी निघणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाकडे २०६ शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये लातूर ४२, रेणापूर ८, औसा १८, निलंगा २४, शिरुर अनंतपाळ २, देवणी ८, उदगीर ३२, जळकोट २, अहमदपूर १५, चाकूर ९, लातूर युआरसी १मध्ये १२ आणि लातूर युआरसी २ मध्ये ३४ शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये २ हजार १७३ जागा आहेत. त्यासाठी १४ जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. २७ जानेवारीपर्यंत मुदत होती. मात्र, पालकांचा प्रतिसाद पाहता त्यास २ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानुसार रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत ६ हजार ५४५ अर्ज दाखल झालेले आहेत.
आता शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर एकच सोडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये निवड झालेल्या बालकांना संदेश पाठविण्यात येणार असून, त्यांना पंचायत समितीमध्ये कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगी संबधित शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. अद्यापर्यंत सोडत कधी निघणार याची तारीख जाहीर नसली तरी लवकरच शिक्षण विभाग तारीख आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करेल, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
तालुकानिहाय आलेल्या अर्जांची संख्या...
लातूरसाठी २५४४, रेणापूर १७५, औसा ३५४, निलंगा ४००, शिरुर अनंतपाळ ५३, देवणी १४०, उदगीर ८०२, जळकोट ५९, अहमदपूर ४८८, चाकूर १९१, लातूर युआरसी १ मध्ये ३७६, लातूर युआरसी दोनमध्ये ९६३ बालकांचे अर्ज आले आहेत. एकूण २०६ शाळांमध्ये २१७३ जागा असून, एकूण ६ हजार ५४५ अर्ज दाखल झालेले आहेत.
राज्यस्तरावर सोडत जाहीर होणार...
अर्ज करण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. त्यानुसार ६ हजार ५४५ अर्ज दाखल झालेले आहेत. आता राज्यस्तरावरुनच सोडत काढण्यात येणार आहे. सोबतच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यानुसार लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. - प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी
मागील वर्षीच्या तुलनेत अर्ज वाढले...
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यात २१७ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. यामध्ये १७५० जागा होत्या. मात्र, यंदा शाळांची संख्या घटली असली तरी प्रवेशाच्या जागा २१७३ वर पोहचल्या आहेत. मागील वर्षी ४५०० अर्ज आले होते. मात्र, यंदा साडेसहा हजार अर्ज आले असून, पालकांची धाकधूक वाढली असल्याचे चित्र आहे.