लातूर मंडळात पुरवणी परीक्षेत दहावीचा ५१ तर बारावीचा ५८ टक्के निकाल
By संदीप शिंदे | Published: August 28, 2023 03:30 PM2023-08-28T15:30:22+5:302023-08-28T15:32:57+5:30
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश मिळणार
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये लातूर विभागीय मंडळाचा दहावीचा ५१.४७ टक्के तर बारावीचा ५८.५५ टक्के निकाल लागला आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल जुनमध्ये जाहीर करण्यात आला. यामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. यात दहावीसाठी लातूर विभागीय मंडळातून ३१४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी २९५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर १५२० विद्यार्थ उत्तीर्ण झाले असून, ५१.४७ टक्के निकाल लागला आहे. बारावीसाठी ४ हजार २८६ विद्यार्थी नोंदणीकृत होते. यापैकी ४ हजार १४८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. तर २४२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ५८.५५ टक्के लागला असल्याचे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष तथा सचिव सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी...
दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार या परीक्षेत दहावीचे १५२० तर बारावीचे २४२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता त्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे. दरम्यान, पुरवणी परीक्षेत दहावीचे १४३३ तर बारावीचे १७१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, त्यांना आता मार्चमध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आहे.