'ज्या प्रवर्गात निवड, तिथेच कायम ठेवा'; बिंदू नामावलीतील अनियमितता दूर करण्याची मागणी
By हरी मोकाशे | Published: July 5, 2023 05:55 PM2023-07-05T17:55:25+5:302023-07-05T17:56:05+5:30
खुला व ईडब्ल्यूएस संघर्ष समितीची मागणी
लातूर : बिंदू नामावलीतील अनियमितता दूर करुन टेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी खुला व ईडब्ल्यूएस संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे सौदागर भिसे, शेख अझहर चाँदपाशा, महादेव बोरफळे, प्रशांत यादव, विनोद शेलार, अशोक जाधव, रामकिशन मायंदे, नितीन वाळके, रविंद्र पाटील, धोंडिराम सोनटक्के, तुकाराम मुंढे, दीपक रोही आदींची उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांची खुला प्रवर्गमध्ये निवड झाली नाही, त्यांना खुला प्रवर्गातून काढण्यात यावे. काही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचाऱ्यांचे निवड प्रवर्ग पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच त्यांच्या मुळ नियुक्ती आदेशावर निवड प्रवर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना खुला प्रवर्गमध्ये दर्शविण्यात आले आहे. परंतु, यापैकी अनेकांच्या आदेशावर मागासप्रवर्ग विशेष अनुशेष भरती असा उल्लेख असल्याने त्यांची निवड मागास प्रवर्गात झाल्याचे सिध्द होते. त्यामुळे त्यांना खुला प्रवर्गमधून कमी करावे. टेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
ज्या प्रवर्गात निवड, तिथेच कायम ठेवा...
काही जिल्हा परिषदेतील बिंदू नामावलीत अनियमितता आहे. जो कर्मचाऱ्याची ज्या प्रवर्गातून नियुक्त झाला आहे, त्यास त्याच प्रवर्गात ठेवण्यात यावे. बदली, अतिरिक्त झाल्यानंतर खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या जागा घटत आहेत, असे निवेदनकर्ते सौदागर भिसे यांनी सांगितले.