सेवानिवृत्त फौजदाराच्या डोक्यात घातली वीट; उसणे पैसे परत मागितल्यामुळे घटना
By हरी मोकाशे | Published: December 8, 2022 08:06 PM2022-12-08T20:06:23+5:302022-12-08T20:06:48+5:30
उसणे पैसे परत मागितल्यामुळे सेवानिवृत्त फौजदाराच्या डोक्यात वीट घातली.
लातूर: हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने सेवानिवृत्त फौजदाराच्या डोक्यात वीट घालून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, नागराळ येथील संदेश हरिचंद्र चांमले यांनी फिर्यादी सेवानिवृत्त फौजदार उमाजी शेषराव मुळे (रा. दावणगाव) यांच्या वडिलांकडून काही महिन्यापूर्वी मुलाच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपये हात उसने घेतले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या वडिलांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी नागराळ येथे चांमले यांनी पैसे देतो म्हणाल्याने मुळे हे तिथे गेले होते. तेव्हा फिर्यादीच्या डोक्यात वीट घालून गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या जवळील साडेचार हजार रुपये रोख काढून घेतले. याप्रकरणी उमाजी मुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदेश हरिश्चंद्र चांमले व गुणवंत संदेश चांमले यांच्याविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. एस.जी. कोंडामंगले हे करीत आहेत.